
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘भारत तेरे टुकडे होंगे’, ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा देऊन लोकप्रिय झालेला दिल्लीच्या ‘जेएनयू’ विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार आता निवडणुकीच्या आखाडय़ात उतरणार आहे. सीपीआयच्या तिकिटावर तो बिहारमधील बेगुसराय येथून निवडणूक लढविणार असून राजदचे नेते लालू यादव यांनीही कन्हैयाकुमारच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे.
बिहारमध्ये भाजप व जदयुच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल तसेच डाव्या संघटनांनी महाआखाडी केली आहे. या महाआघाडीकडूनच कन्हैयाकुमार हा बेगुसराय येथून निवडणूक लढविणार आहे. कन्हैयाकुमारच्या उमेदवारीवर राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी कोणताही आक्षेप नसल्याचे सांगितले आहे. स्वतः कन्हैयाकुमारने मात्र उमेदवारीवर कोणतेही भाष्य केलेले नाही. बेगुसराय लोकसभा मतदारसंघावर सध्या भाजपचा कब्जा आहे. भाजपचे भोला सिंह हे 2014 मध्ये येथून लोकसभेवर निवडून गेले होते.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने एप्रिलमध्येच कन्हैयाकुमारला राष्ट्रीय परिषदेवर घेतले होते. 125 जणांच्या राष्ट्रीय परिषदेत कन्हैयाकुमारचा समावेश झाल्याने तो राष्ट्रीय राजकारणात येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. राजद, काँग्रेस आणि डाव्यांनी महाआघाडी केल्यास आपण बिहारमधून नशीब अजमावण्यास तयार असल्याचे कन्हैयाकुमार याने म्हटले होते.
























































