
वाई येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर वनविभागाने वणवा लावल्या प्रकरणी रंगेहात पकडले होते. सदरचा गुन्हा न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने सदर दोन्ही आरोपींना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला होता. सदरच्या दंडांची रक्कम संबंधितांनी न्यायालयात भरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वनपरिक्षेत्र (वाई) वनपरिमंडळ वाशिवली मधील रेनावळे राखीव वनक्षेत्रास लागलेला वणवा वनअधिकारी व वनकर्मचा-यांनी वेळीच दक्षता घेवून विझवला होता. सदरचा वनवा आरोपी शिवाजी लक्ष्मण पारटे (रा.वेलंग), निलीमा गणेश खरात (रा.रेनावळे) यांनी जिल्हा परिषद शाळा रेनावळे परिसरात कचरा व कागद जाळण्यासाठी आग निर्माण केली होती. सदरच्या कच-यातील कागद व पालापाचोळा हा वा-याने उडून शेजारच्या क्षेत्रात जावून तेथील मोठया प्रमाणात असलेल्या गवताने पेट घेतला. यामुळे रेनावळे येथील वनक्षेत्रात आग लागली होती.
सदरची आग ही वनअधिकारी व वनकर्मचारी यांनी भरउन्हात विझवली. तोपर्यंत वनक्षेत्रातील 22 हेक्टर वनक्षेत्र जळून शासनाचे 11 हजार रूपयाचे नुकसान झाले होते. सदर आरोपीवर भारतीय वनअधिनियम, 1927 चे कलम 26 (1).(ब),(फ) अन्वये नोंद करण्यात आला होता.
उपवनसंरक्षक भारतसिंग हाडा, सहाय्यक वनसंरक्षक गोसावी, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास तत्कालीन वनपाल भाऊसाहेब कदम, रत्नकांत सिताराम शिंदे यांनी संदिप पवार , प्रदीप जोशी यांचे मदतीने पुर्ण करुन आरोपींविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांचे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सदर वनगुन्ह्यातील दोन्ही आरोपींनी वनवणव्याबाबतचा गुन्हा कबुल केला होता. न्यायालयाने वनगुन्ह्यातील आरोपी शिवाजी लक्ष्मण पारटे, निलीमा गणेश खरात यांना प्रत्येकी 5 हजार रुपये दंड व दंड न भरलेस 20 दिवसांची साधी कैद शिक्षा सुनावली होती. दरम्यान आरोपींनी एकूण 10 हजार रुपये दंड न्यायालयात भरला आहे.
























































