
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत आता बॉलीवूड कलाकारांची भर पडली असून त्याला दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याचा नुकताच झालेला वाढदिवस कारणीभूत ठरला आहे. करणने दिलेल्या वाढदिवसाच्या पार्टीला हजर असलेल्या कैतरिना कैफ, कार्तिक आर्यन यांच्यासह सुमारे 50 ते 55 कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असून करणचा वाढदिवस हा सुपरप्रेडर ठरल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून 37 पर्यंत गेलेली संख्या पुन्हा हजाराच्या दिशेने सरकत आहे. मुंबईत शनिवारी 889 कोरोना रुग्ण सापडले आहेत तर एकाच मृत्यू झाला आहे. अशाच दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याने यशराज फिल्म स्टुडिओत त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त दिलेली पार्टी ही सुपरस्प्रेडर ठरली आहे. 25 मे रोजी झालेल्या या पार्टीत सहभागी झालेली अभिनेत्री कैतरिना कैफ आणि अभिनेता कार्तिक आर्यन हे एकापाठोपाठ कोरोना पॉझिटिव्ह आले आणि कोरोनाची ही लागण करणच्या पार्टीत झाल्याचे पुढे आले. करणच्या पार्टीत हृतिक रोशन, कैतरिना कैफ, विकी कौशल, करीना कपूर, सैफ अली खान, मनीष मल्होत्रा, सलमान खान याच्यासह सुमारे 50 ते 55 कलाकार सहभागी झाले होते. या सर्वांना कोरोनाची लागण झाली असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे पार्टीचे आयोजन करून कोरोना पसरवायला कारणीभूत ठरणाऱया व्यक्ती किंवा समारंभाच्या आयोजकांवर कोणतीही कारवाई करता येत नाही. यशराज फिल्म या स्टुडिओवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती चुकीची आहे. प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळत जबाबदारीने वर्तन करावे.
– पृथ्वीराज चौहान, सहाय्यक आयुक्त, के-पश्चिम
































































