
‘न खाऊंगा, न खाने दुंगा’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी कितीही म्हणत असले तरी कोरोना महामारीत कर्नाटकातील भाजपचे सरकारचे हात भ्रष्टाचाराने बरबटले होते. कोविड काळात तब्बल 40 हजार कोटींचा महाघोटाळा कर्नाटकात झाला असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला आहे. दरम्यान, कर्नाटकातील भाजप सरकार 40 टक्के कमिशन सरकार होते हे या आरोपांमुळे पुन्हा सिद्ध झाले आहे.
कर्नाटकात 2019 ते 2023 या काळात भाजपचे सरकार होते. 27 जुलै 2019 ते 28 जुलै 2021 या दरम्यान बी.एस. येडीयुरप्पा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 19 मे 2023 पर्यंत बसवराज बोम्मई मुख्यमंत्री बनले. 2020-21 या काळात कर्नाटकासह देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. त्यावेळी राज्यातील येडीयुरप्पा सरकारने तब्बल 40 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप विजयपुरा मतदारसंघाचे भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी आमदार यत्नाळ यांनी माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा त्यांचा मुलगा भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि कुटुंबियांवर जोरदार टीका केली.
पक्षातून काढून तर दाखवा
कोरोना काळात कर्नाटकातील भाजप सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. या आरोपांमुळे मला पक्षाने नोटीस दिली आणि पक्षातून काढले तर मी आणखी घोटाळे उघडकीस करेन अशी धमकीच आमदार यत्नाळ यांनी भाजपला दिली आहे.
लोकलेखा समितीकडे पुरावे आहेत
आपण करत असलेल्या आरोपांसंदर्भातील कागदपत्रे लोकलेखा समितीकडे उपलब्ध आहेत असे आमदार यत्नाळ म्हणाले. पत्रकारांना पुरावे हवे असल्यास त्यावेळचे कायदामंत्री एच. के. पाटील यांच्याशी बोलावे. पाटील यांना लोकलेखा समितीचे अध्यक्ष बनण्याची संधी होती. मात्र, आपण अध्यक्ष झाल्यास गैरव्यवहार सार्वजनिक करू असा पवित्रा पाटील यांनी घेतला होता. त्यामुळे अध्यक्षपद त्यांना दिले नाही, असा आरोपही यत्नाळ यांनी केला.
आरोपांना बळकटी मिळाली – सिद्धरामय्या
विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव करून मे 2023 ला कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले आणि सिद्धरामय्या मुख्यमंत्री बनले. निवडणूक प्रचारात काँग्रेस पक्षाने भाजपवर 40 टक्के कमिशनचे आरोप केले होते. आता आमदार यत्नाळ यांच्या गौप्यस्पह्टामुळे 40 टक्के कमिशनच्या आरोपांना बळकटी मिळाल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
असा झाला महाघोटाळा
– बंगळुरात 10 हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. सरकारने रुग्णालयातील खाटा भाडय़ाने घेतल्या. त्यासाठी प्रत्येक खाटेचे भाडे प्रतिदिन 20 हजार रुपये होते. याच दराने सलाईन स्टँड असलेल्या दोन खाटा विकत घेता आल्या असत्या; पण सरकारने त्या घेतल्या नाहीत असे आमदार यत्नाळ यांनी सांगितले.
– भाजप सरकारने प्रत्येक रुग्णामागे 8 ते 10 लाख रुपयांचे बिल दाखवून लूट केली. रुग्णांचे बिल वाढवून घोटाळा केला.






























































