
कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाने मशिदीवरील लाऊडस्पीकर्स रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत अजानसाठी वापरू नयेत हा आपलाच फतवा मागे घेत गुरुवारी पलटी मारली आहे. नागरिकांची झोपमोड होऊ नये म्हणून 17 मार्चला आपणच घेतलेल्या निर्णयाला कर्नाटक औकाफ आणि वक्फ बोर्डाने केराची टोपली दाखवली आहे. आता नव्या परिपत्रकानुसार वक्फ बोर्डाने पहाटे 5 वाजता मशिदीतून अथवा दर्ग्यातून होणाऱ्या अजानसाठी लाऊडस्पीकर वापरायला परवानगी दिली आहे. आवाजाच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणाऱ्या नॉईस पोल्युशन नियम 2000 नुसार याआधी कर्नाटक वक्फ बोर्डाने रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत मशिदीवरील भोंगे बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. पण अखेर मुस्लिम संघटनांच्या दबावापुढे कर्नाटक वक्फ बोर्डाने सपशेल लोटांगण घालत आपले अगोदरचे परिपत्रकच मागे घेतले आहे.
























































