धक्कादायक ! शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडले कंडोम, गर्भ निरोधक साधने; शिक्षक आणि पालक हैराण

कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये विद्यार्थ्यांनी मोबाईल लपवून शाळेत आणल्याची तक्रार आली होती. यामुळे शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली. याच वेळी अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे शाळा प्रशासनातील अधिकारी आणि पालकही हैराण झाले आहेत.

कर्नाटकातील मॅनेजमेंट असोसिएटेड विथ प्राइमरी अँड सेकेंडरी स्कूल्स (KAMS) ने शाळांना विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी सुरू करण्यास सांगितले होते. मिळालेल्या सूचनेनुसार, शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी करण्यात आली. त्यावेळी इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात कंडोम, गर्भनिरोधक, लायटर, सिगारेट, व्हाइटनर आणि रोख रक्कम आढळून आली. काही शाळांनी याबाबत विशेष पालक-शिक्षक बैठका बोलावल्या. विद्यार्थ्यांच्या या चिंताजनक वर्तनामुळे शाळांनी पालक बैठका घेऊन आपल्या मुलांशी या विषयावर बोलण्यास सांगितले. त्यासाठी शाळांनी पालकांना नोटिसा बजावल्या.

शाळांनी पालकांना बजावलेली नोटीस पूर्वीपेक्षा खूप वेगळी होती. या नोटीशीमध्ये विद्यार्थ्यांना निलंबित करण्याऐवजी समुपदेशनाची शिफारस करण्यात आली होती. मुख्याध्यापकांनी या नोटिशीमध्ये म्हटले आहे की, “आमच्या शाळांमध्ये समुपदेशन सत्रे असली तरी, आम्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना मुलांसाठी बाहेरून मदत घेण्यास सांगितले आहे आणि याकरिता विद्यार्थी 10 दिवसांपर्यंत सुट्टी घेऊ शकतात.

दुसऱ्या एका घटनेमध्ये इयत्ता 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या दप्तरात कंडोमचे पाकीट सापडले होते. या विद्यार्थिनीला जेव्हा याविषयी विचारण्यात आले तेव्हा उत्तर दिले की, ती ज्या ठिकाणी शिकवणीला जाते तेथील लोकं याचा वापर करतात. या घटनेबाबत (KAMS) केएएमएसचे सरचिटणीस डी. शशी कुमार यांनी दिलेली माहिती अशी की, सुमारे 80 शाळांमध्ये तपासणी करण्यात आली. तेव्हा ‘गर्भनिरोधक आय-पिल विद्यार्थ्याच्या बॅगेत होती. तसेच पाण्याच्या बाटल्यांमध्ये दारू होती. आम्ही विद्यार्थ्यांशी संबंधित या समस्येवर मात करण्यासाठी संघर्ष करत आहोत. शिक्षक आणि वर्गमित्रांना त्रास देण्यासाठी धमकावण्याचे आणि अपशब्द वापरण्याचे कामही अनेक विद्यार्थी करत असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे.

अभय रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ए. जगदीश यांनी डेक्कन हेराल्ड यांच्याशी या घटनेबाबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, हे प्रकरण पालकांच्या काळजीत भर घालणारे आहे. एका आईला तिच्या 14 वर्षाच्या मुलाच्या शू रॅकेमध्ये कंडोम सापडला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, काही मुलांना प्रयोग करायला आवडतात आणि त्यांना अशा क्रियाकल्पांमध्ये भाग घेणे आवडते. यामध्ये विशेषत: धूम्रपान, मादक पदार्थांचे व्यसन आणि विरुद्ध लिंगी व्यक्तिशी अति शारीरिक जवळीक यांचा समावेश होतो. यावर पालकांनी मुलांना मार्गदर्शन करावे, असा माझा त्यांना सल्ला आहे.