
कर्नाटकमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदाची रेस सुरू आहे. निकाल लागून चार दिवस झाले तरी मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र मुख्यमंत्रीपदाच्या या रेसमध्ये सिद्धरामय्या पुढे असल्याची माहिती मिळतेय. त्यांना राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांचाही पाठिंबा असल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे शिवकुमार यांनीही मुख्यमंत्रीपदाची मागणी केली असून त्यांना राहुल गांधी यांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. दोघेही कर्नाटकमधील बडे आहेत, या रेसमध्ये सिद्धरामय्या जरी काकणभर पुढे असले तरी संपत्तीच्या बाबतीत मात्र शिवकुमारच बॉस आहेत.
डी. के. शिवकुमार यांचा कर्नाटकच्या विजयात सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदासाठी ते प्रबळ दावेदार आहेत. मात्र, त्यांना मुख्यमंत्री केल्यास त्यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा पुन्हा ससेमिरा लावला जाऊ शकतो, अशी भीती काँग्रेस हायकमांडला आहे. त्यामुळेच हा धोका टाळण्यासाठी सिद्धरामय्या यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा देऊन शिवकुमार यांना नवीन सरकारमध्ये अन्य मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता आहे.
सिद्धरामय्या यांनी याआधी 2013 ते 2018 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यांच्याकडे चांगला अनुभवही असून ते एकूण आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सिद्धरामय्या यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 20 कोटींची संपत्ती आहे. याच जवळपास साडे चार कोटींची चल संपत्ती, तर जवळपास साडे पंधरा कोटींच्या अचल संपत्तीचा समावेश आहे.
चल संपत्तीमध्ये त्यांच्याकडे 7 लाख 15 हजारांची रोकड, 63 लाख 26 हजार 449 रुपये बँक डिपॉझिट, 20 हजारांचे बॉन्डस शेअर, 4 लाख 4 हजारांची एलआयसी पॉलिसी, 13 लाख रुपयांची टोयाटो इनोव्हा कार, 50 लाख 4 हजार 250 रुपयांची सोन्याची आभुषणे यांचा समावेश आहे. तर अचल संपत्तीमध्ये 1 कोटी 15 लाख रुपयांची शेतजमीन, 3 कोटी 50 लाख रुपयींची जमीन, 5 कोटींची इमारत आणि 6 कोटींचे घर-फ्लॅटचा समावेश आहे.
Karnataka CM decision ‘एकतर मला मुख्यमंत्री करा किंवा…’, शिवकुमार यांची खरगेंकडे मागणी
दुसरीकडे डी. के. शिवकुमार हे कॉँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री होण्याचे खूप जुने स्वप्न त्यांचे आहे. 2018 ला त्यांची संधी हुकली होती. सलग आठ वेळा ते आमदार आहेत. शिवकुमार हे काँग्रेसमधील श्रीमंत नेते आहेत. त्यांच्याकडे 840 कोटींची संपत्ती आहे. 2018 ला निवडणूक आयोगाला त्यांनी याबाबत माहिती दिली होती. तर सध्या त्यांची संपत्ती 1 हजार कोटींच्या पार गेल्याची चर्चा आहे. यात त्यांच्या 101 कोटी रुपयांच्या चल, तर 738 कोटींच्या अचल संपत्तीचा समावेश आहे.




























































