
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून समोर आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस प्रचंड बहुमताने स्वबळावर सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. संध्याकाळपर्यंत काँग्रेस 137 तर भाजप 64 जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटकातील पराभव हा पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या भाजपसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. कारण दक्षिणेतील एकमेव राज्य भाजपच्या हातून गेलं आहे.
दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकमध्ये भाजपच्या पराभवाचा परिणाम 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांवरही होण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील सर्व राज्यांपैकी फक्त कर्नाटकातच भाजपचे सरकार होते. त्यामुळे वर्षअखेरीस होणाऱ्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होईल, अशी आशा भाजपला होती. कर्नाटकातूनच दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाय पसरवण्याचा पक्षाचा प्रयत्न होता.
कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या दक्षिणेकडील पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 129 जागा आहेत. मात्र कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामुळे भाजपच्या मिशन दक्षिणला झटका बसला आहे.






























































