गुंतवणुकीत कर्नाटकाने महाराष्ट्र, गुजरातला मागे टाकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

गुजरातमध्ये मोठमोठे प्रकल्प वाजतगाजत आणले जात असल्याच्या बातम्या अनेकदा वाचायला मिळतात. महाराष्ट्रातही मोठी गुंतवणूक झाल्याचे मुख्यमंत्री छाती फुगवून सांगतात, पण कर्नाटकने गुंतवणुकीच्या बाबतीत गुजरात आणि महाराष्ट्रालाही मागे टाकले आहे. हिंदुस्थानच्या 25 टक्के गुंतवणुकीचे प्रस्ताव कर्नाटकात आल्याचे उघड झाले आहे. गुजरातमध्ये प्रकल्पांची संख्या अधिक दिसत असली तरीही प्रकल्पांच्या प्रस्तावांची संख्या कर्नाटकात सर्वाधिक आहे. भविष्यात हे प्रकल्प कर्नाटकात उभे राहणार असून कर्नाटक वेगाने प्रगती करणारे राज्य ठरणार आहे. सत्ताधारी जेडीएस आणि काँग्रेसच्या काळात कर्नाटकने ही प्रगती साधली आहे.

मागील दोन महिन्यांत कर्नाटकात एयरोस्पेस, आयरन आणि स्टील, फार्मास्युटिकल, ऑटोमोबाईल, टेक्सटाईल, आयटी यांसारख्या क्षेत्रांतील 23 प्रस्ताव आले आहेत. कर्नाटकात सर्वाधिक प्रस्ताव निवडणुकीआधी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आले. त्यानंतर काही महिने यात घसरण झाली, परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आणखी जोर धरला. या प्रस्तावांमध्ये 240 कोटी रुपयांचा जेएसडब्ल्यू सोलर प्रोजेक्ट्स, एमके ऍग्रोटेकचा 100 कोटी रुपयांचा प्रकल्प, मनी ग्रुपचे अनेक प्रस्ताव, एसके स्टील प्लांट, अल्ट्राटेक आणि अदानी सिमेंट्स यांसारख्या मोठय़ा प्रकल्पांचा समावेश आहे.

गुंतवणुकीचे पहिल्या नऊ महिन्यांतील प्रस्ताव

राज्य -प्रकल्पांची संख्या- किंमत (कोटी)

कर्नाटक- 92 – 83,236
गुजरात- 347 – 59,089
महाराष्ट्र-  275-  46,428
राजस्थान- 65 – 35,192
मध्य प्रदेश-  99 – 22,288
इतर राज्ये-  608 – 92,334
हिंदुस्थान-  1,486 – 3,38,567