
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन सुरू आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या जवळच्या आमदारांनी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. शिवकुमार यांच्यासोबत 100 हून अधिक आमदार असल्याची चर्चा होती. त्यामुळे सिद्धरामय्या यांची खुर्ची धोक्यात आली होती. मात्र आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यात नेतृत्व बदलाच्या अटकळींचे खंडन केले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यात नेतृत्व बदल होणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मोकळी नसून पाच वर्षाचा कार्यकाळ आपण पूर्ण करू. तसेच काँग्रेस हायकमांडने आपल्याला पद सोडण्यास किंवा उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना ते पद देण्यास सांगितल्याचे वृत्तही सिद्धरामय्या यांनी फेटाळले. ‘इंडिया टुडे‘ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत विधान केले.
मी पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर राहीन. याआधीही मी हे स्पष्ट केले होते. 2 जुलै रोजी डी.के. शिवकुमार यांच्या समोरच याबाबत विधान केले होते, असे सिद्धरामय्या म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी डी.के. शिवकुमार इच्छुक उमेदवार नक्कीच आहेत. त्यात काहीही चूक नाही. पण त्यांनीच आधी म्हटले होते की, खुर्ची मोकळी नाहीय, त्याप्रमाणे मी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेन, असेही ते म्हणाले.
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रपदीसाठी हायकमांडने रोटेशन पद्धत वापरण्यात येण्याच्याही वावड्याच असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले. अडीच वर्षांसाठी पद हे कधीच ठरले नव्हते. आणि ते योग्यही नाही. अर्थात हायकमांड आम्हाला जे सांगेल, जे निर्णय घेतील ते आम्हाला पाळावे लागतील. मल्लिकार्जुन खरगे यांनीही आधीच सांगितले आहे की, आमचा पक्ष हायकमांड आहे. ते जे काही म्हणते त्याचे पालन मी आणि डी.के. शिवकुमारही करेन, असेही ते म्हणाले.
कर्नाटकात डी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा, 100 हून अधिक आमदारांची काँग्रेस नेत्यांकडे मागणी
दरम्यान, नेतत्वाबाबत रणदीप सुरजेवाला यांनी कोणताही सवाल उपस्थित केला नसल्याचेही ते म्हणाले. तसेच डी.के. शिवकुमार यांना पाठिंबा देणारे काही आमदार नक्कीच असतील, पण जास्त नाहीत, असेही सिद्धरामय्या म्हणाले.