
कश्मीर खोऱयातील हिंदूंच्या सुरक्षेचे पॅकेज फुसके निघाल्याने कश्मिरी पंडितांवर पुन्हा खोऱयातून ‘पॅकअप’ करण्याची नामुष्की ओढवली आहे. दहशतवाद्यांकडून सुरू असलेला ‘टार्गेट किलिंग’चा हैदोस रोखण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. 20 दिवस तीव्र निदर्शने केल्यानंतरही सुरक्षेबाबत केंद्राकडून घोर निराशा झाल्याने कश्मिरी पंडितांनी शुक्रवारपासून खोरे सोडून जम्मूत स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व सामानही गुंडाळले आहे. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे 90 च्या दशकातील सर्वात मोठय़ा पलायनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी मागील अवघ्या 20 दिवसांत सहा ‘टार्गेट किलिंग’ करून निष्पाप हिंदू नागरिकांचे बळी घेतले. हा नरसंहार वेळीच रोखण्याची मागणी कश्मिरी पंडितांनी केंद्र सरकारकडे केली. यासाठी 24 तासांचा अल्टिमेटमही दिला. त्यानंतरही सरकार ढिम्मच राहिले. त्यामुळे कश्मिरी पंडितांचा संयम सुटला असून ते आता कश्मीर खोरे सोडण्याच्या टोकाच्या निर्णयापर्यंत पोहचले आहेत. दहशतवादी हल्ल्यांमुळे भेदरलेल्या अनंतनागच्या मट्टन कॉलनी, वैस्सू आदी परिसरातील पंडितांनी गुरुवारी सर्व सामान भरले, मात्र सुरक्षा बलांचे जवान त्यांना कॅम्पमधून बाहेर पडू देत नाहीत. खोऱयातील मृत्यूच्या जबडय़ातून बाहेर पडून जम्मूतील सुरक्षित ठिकाण गाठण्याची सर्व तयारी त्यांनी केली आहे. कश्मीर खोऱयातून बाहेर पडण्यासाठी सुरक्षा द्या, अशी मागणी हिंदू लोकांनी अनंतनागच्या जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. सरकारने कितीही अडवले तरी आम्ही थांबणार नाही, असा निर्वाणीचा इशारा पंडितांनी केंद्राला दिला आहे.
25 केंद्रीय मंत्र्यांची फौज कश्मीर दौऱयावर जाणार
एकीकडे कश्मीर पंडितांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असताना केंद्रातील भाजपचे मंत्री मात्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. केंद्रशासित प्रदेश जम्मू-कश्मीरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी तसेच निवडणुकीसंबंधी इतर कार्यक्रम घेण्यासाठी जून-जुलैमध्ये तब्बल 25 केंद्रीय मंत्र्यांची फौज जम्मू-कश्मीरच्या दौऱयावर जाणार आहे. यात नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, प्रल्हाद पटेल यांचा समावेश आहे. विकासकामांचा आढावा घेणे, सामान्य मतदारांशी संवाद साधणे अशी जबाबदारी या मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.
– केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2019 ते मार्च 2022 या अवधीत चार कश्मिरी पंडित आणि 14 हिंदू व बिगरकश्मिरी मजुरांची हत्या झाली.
– मागील 20 दिवसांत ‘टार्गेट किलिंग’च्या 6 घटना घडल्या. 12 मे रोजी बडगाममध्ये राहुल भट्ट, 13 मे रोजी पुलवामात रियाज अहमद ठाकोर, 24 मे रोजी सैफुल्लाह कादरी, 25 मे रोजी अमरीन भट्ट आणि 31 मे रोजी शिक्षिका रजनी बालाची दहशतवाद्यांनी गोळय़ा झाडून हत्या केली.
– 1990 मध्ये खोऱयातून कश्मिरी पंडितांचे सर्वात मोठे पलायन झाले होते. त्या वर्षी तब्बल 219 कश्मिरी पंडित दहशतवादी हल्ल्यात मारले गेले होते. त्यावेळी 1 लाख 20 हजार कश्मिरी पंडितांनी पलायन केले होते.
20 ते 30 गाडय़ा जम्मूच्या दिशेने रवाना
अनेक कश्मिरी पंडित कुटुंबांनी खोरे सोडण्यास सुरुवातही केली. गुरुवारी सकाळीच 20 ते 30 गाडय़ा जम्मूच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. सुरक्षेच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर कश्मीर पंडितांच्या स्थलांतराचा वेग वाढेल अशी शक्यता आहे.
























































