
पर्यावरणरक्षण आणि निसर्ग समृद्धीसाठी सदैव तत्पर राहणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी कात्रजची टेकडी वणव्यात भस्म होण्यापासून वाचवली. पुणेमार्गे सातार्याच्या दिशेने जात असताना शिंदे यांना कात्रजच्या घाटावर वणवा पेटलेला दिसताच त्यांनी गाडी थांबवून धाव घेतली आणि आपल्या सहकार्यांच्या मदतीने तो वणवा विझवला.
सयाजी शिंदे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी ते जात होते. त्यांच्यासोबत नगरसेवक राजेश बराटे हेसुद्धा होते. कात्रजच्या नवीन बोगद्याजवळून जात असताना त्यांना वर धूर दिसला. गाडी थांबवून त्यांनी निरखून पाहिले असता वणवा पेटला होता. तत्काळ त्यांनी आगीच्या ठिकाणी धावत जाऊन झाडाच्या फांदीने आग झोडपून विझवायला सुरुवात केली. सहकार्यांनाही त्यांनी आगीवर माती टाकून विझवण्यास सांगितले.
वार्याचा वेग जास्त असल्याने आग पुढे पुढे सरकत होती, पण शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रयत्नांची शिकस्त करत आग विझवली. आग इतकी पसरली होती की ती विझवण्यास एक तास लागला. ही आग वेळीच विझवली गेली नसती तर कात्रजचा पूर्ण डोंगर पेटला असता असे सांगतानाच कुणीतही पेटती विडी किंवा सिगारेट टाकल्याने ही आग पेटली असावी असा अंदाज शिंदे यांनी व्यक्त केला. होळीसाठी झाडे तोडून जाळू नका, निसर्गाचे, पशुपक्ष्यांचे रक्षण करा असे आवाहनही शिंदे यांनी केले.






























































