
सामना प्रतिनिधी। खेड
विद्युत मीटरमध्ये हुक लावून वीज चोरी केल्याप्रकरणी खेड शहरातील दोन वीजग्राहकांवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. पोत्रीक हाजीमिया ए. आणि मोहम्मद इब्राहिम ढेणकर अशी या दोघांची नावे आहेत. चिपळूण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
खेड शहरातील पोत्रिक मोहल्ला येथे राहणारे हाजीमिया ए यांनी 25 मार्च 2014 रोजी मीटरमध्ये हुक लावून 20,050 रुपयांची वीज चोरी केली तर महाडिकवाडी येथे राहणारे मोहम्मद इब्राहिम ढेणकर यांनी 52 हजार 910 रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले.
या दोन्ही ग्राहकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यातही अशाच पद्धतीने वीज चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. दापोली, खेड व मंडणगड या तीन तालुक्यात वीज चोरी करणारे चार वीजग्राहक असून या चौघांनी एकूण 82 हजार 230 रुपयांची वीज चोरी केली आहे.
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील केसरसिंह गोपाळसिंह चुनोडिया या ग्राहकांने 4 एप्रिल 2014 रोजी वीज मीटरमध्ये हुक लावून 1720 रुपयांची वीजचोरी केली तर मंडणगड तालुक्यातील महम्मद इब्राहिम काझी यांनी 9 जानेवारी 2016 रोजी मीटरमध्ये हुक लावून 7550 रुपयांची वीज चोरी केली असल्याचे तपासात उघड झाले आहे.




























































