घेरापालगड ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। खेड

खेड तालुक्यातील घेरा पालगड ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीला पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या मुंबईस्थित पालखी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला.

गेल्या काही महिन्यात तालुक्यातील अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. पक्षाला लागलेली ही गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांसह सर्वच पदाधिकारी जीवतोड प्रयत्न करत आहेत.

तालुक्यातील घेरापालगड हे गाव राष्ट्रवादी आमदारांच्या शेजारी असलेले गाव. या गावावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. सरस्वती महाडिक या ग्रामपंचायतीच्या सरपंच तर सुधीर विचारे हे उपसरपंच होते. ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून सूत्रं हाती घेताना महाडिक यांनी गावच्या विकासाशी बांधील असल्याची ग्वाही दिली होती. मात्र ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार पक्षाच्या माध्यमातून विकासकामे न करता आल्याने त्यांनी अखेर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून विकासाशी बांधिलकी असलेल्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयानुसार सरपंच श्रीमती महाडिक, उपसरपंच सुधीर विचारे, ग्रामपंचायत सदस्य केशव महाडिक, अविनाश कदम, श्रद्धा चव्हाण, सनिका मेरे, घेरापालगड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिपक चव्हाण यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या मुंबईतील पालखी निवासस्थानी रामदास कदम यांनी या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी युवा नेते योगेश कदम, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कदम आदी उपस्थित होते.

summary-khed-ncp-workers-join-shivsena