खेडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। खेड

खेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली असून नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. गेल्या महिनाभरात पिसाळेल्या कुत्र्यांनी एक दोन नव्हे तर 15 पेक्षा जास्त लोकांवर हल्ला केला. यात अनेकजण जखमी झाले आहेत. नगरपालिका प्रशासनाने तातडीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

खेड शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांवर कुत्र्याचे टोळके हल्ला करत आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून ये जा करावी लागत आहेत.

शहरातील डाकबंगला, महाडनाका, बाजारपेठ, तीनबत्तीनाका या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठय़ा प्रमाणात आहे. रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या कचऱयाच्या ढिगाऱ्याजवळ कुत्र्यांची टोळकी असतात.

काही दिवसांपुर्वी डाकबंगला परिसरात अशाच एका पिसाळलेल्या कुत्र्याने एका चिमुरडय़ावर हल्ला करुन त्याला जखमी केले. त्यामुळे या भागात तर कुत्र्यांची दहशहत कमालीची वाढली आहे. रात्री उशीरा घराकडे परतणाऱयांवर तर ही कुत्री हमखास हल्ला करतात. दुचाकी, तीनचाकी वाहनांचा पाठलाग करतात. नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावर उनाड फिरणाऱया पाळीव जनावरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. यामुळे नगरपालिका प्रशासनाने याचा गांभीर्यांने विचार करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.