
खोल नदीच्या डोहात वावर असणाऱ्या महाकाय मगरी आता थेट नागरी वस्तीत येऊ लागल्या असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील आवाशी गणेशनगर येथे नागरी वस्तीत महाकाय मगरीचे दर्शन झाल्याने रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. रात्रीच्या वेळेत एका घराच्या अंगणात ही मगर येऊन बसल्याचे पाहावयास मिळाले होते.
मुंबई गोवा महामार्गावरील आवाशी गावात असलेल्या गणपती विसर्जन तलावाभोवती गणेशनगर ही वस्ती गेली अनेक वर्षापासून वसली आहे. या वस्तीत असलेल्या तलावात गेल्या काही वर्षांपासून मगरींचा वावर आहे. काहींना तिचे दर्शनही झालेले आहे. गणपती उत्सवाआधीपासून तिचे सातत्याने दर्शन होत आहे. येथील रहिवाशांनी याबाबतची माहिती आवाशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वनविभाला दिली होती. मानवी वस्तीत असलेल्या तलावात वारंवार दर्शन देण्याऱ्या मगरीचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करणे गरजेचे होते. मात्र वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले.
दोन दिवसांपूर्वी ही महाकाय मगर येथील एका घराच्या अंगणात येऊन बसली होती. काहींच्या तर परसदारातही मगर येऊन बसल्याचे पहावयास मिळाले आहे. वनविभागाने वेळीच या मगरीच्या बंदोबस्त केला नाही तर अंगणापर्यंत पोहचलेली मगर घरात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे येथील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.































































