भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारले, सात ते आठजणांवर गुन्हा दाखल

दोन गटात झालेले भांडण सोडविण्यात गेलेल्या युवकाला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी खेड पोलिसात सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी रात्री चाकाळे येथील महालक्ष्मी मंदिराबाहेर घडला. खेड शहरातील शिवतर रोड परिसरात राहणार राकेश खेडेकर हा या मारहाणीत जखमी झाला असून त्याने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 6 डिसेंबर रोजी चाकाळे ग्रामदैवत महालक्ष्मी देवीचा जत्रोत्सव असतो. यासाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी झालेली असते. दरम्यान रस्त्यावर चिंचघर गावच्या दोन गटात झालेली वादावादी सोडविण्यासाठी गेलेल्या रोहन राकेश आणि त्याच्या मित्राला पंकज वाडकर आणि त्याच्या मित्रांनी लाथाबुक्क्यांनी जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत रोहन जखमी झाला.

रोहन यांनी खेड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, खेड पोलिसांनी पंकज वाडकर, प्रशांत वाडकर, सुमित बर्गे, सागर कदम, रोहन पार्टे यांच्यासह अन्य तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.  खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.