किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना याच हंगामात सुरू करावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। किल्लारी

लातूर- धाराशिव दुष्काळ मुक्ती निर्धार सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्लारी सहकारी साखर कारखाना याच हंगामात सुरू करण्याचे आश्वासन जाहीर सभेत दिले होते. मात्र दोन महिने लोटले तरीही अद्याप त्या संदर्भातील हालचाली सुरू झालेल्या नाहीत. तरी कारखाना सुरू करण्यासाठी लवकरात लवकर हालचाली सुरू करून याच हंगामात किल्लारी साखर कारखाना सुरू करावा अशी मागणी किल्लारी साखर कारखाना बचाव कृती समितीने केली आहे.

सन 2018-19 सालाचा गळीत हंगाम कारखान्याच्या अवसायक मंडळा मार्फत युद्ध पातळीवर सुरू करण्यात यावा. यासाठी लागणारे अर्थसहाय्य देण्यात यावे. कारखान्यातील यंत्र सामग्रीची दुरुस्ती एक महिन्याच्या आत पूर्ण करून देण्यास कामगार तयार आहेत. याशिवाय या भागातील उस उत्पादक शेतकरी उस पुरवठा करण्यास तयार असून राज्य शासनाच्या मदतीने तोड व वाहतुकीची यंत्रणा उभी करता येणार आहे. विशेष म्हणजे हा हंगाम सुरू झाल्यास किमान दोन लाख टना पर्यंत गाळप होऊ शकते. तथापि मुख्यंमत्र्यांनी उच्च स्तरीय बैठ्कीचे आयोजन करून किल्लारी साखर कारखाना सुरु करण्याचा निर्णय घ्यावा,अशी विंनती निवेदनातून करण्यात आली आहे.

प्रथमेश्वरा ग्रह निर्मिती प्रा.लि. फर्मला किल्लारी कारखाना वीस वर्षे चालवण्यासाठी दिलेला निर्णय घातक आहे. एक प्रकारे या माध्यमातून कारखान्याची मोफत विक्रीच आहे असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. सदर फर्मने अद्याप राज्य बँकेबरोबर कोणत्याही प्रकारचा करार केला नसल्याचेही नमूद करण्यात आला आहे. तुतेजा,रंजनाकुमार व मित्रा समितीच्या सवलती या कारखान्यास मिळाव्यात. कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत करून थकीत वेतन व सेवा निवृतीचे लाभ द्यावेत अशी विनंती करून वरील मागणीची पूर्तता न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

सदर मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री,सहकार मंत्री,पालक मंत्री व प्रशासकीय चेअरमन यांना देण्यात आले आहे या निवेदनावर माजी आमदार माणिकराव जाधव,गुंडाप्पा बिराजदार, विनोद बाबळसुरे, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रमेश हेळंबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.