ड्रोन उडवण्याआधी जाणून घ्या नियम आणि कायदे.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. 27 मे रोजी सुरू झालेल्या या कार्यक्रमाची आज 29 मे रोजी दुपारी 2 वाजता सांगता होणार आहे. सरकारने ड्रोन उडविण्यासाठीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत, ज्याची माहीती असणे आवश्यक आहे. जाणून घेऊया त्याची नियमावली व लायसन्सपासून UIN नंबरपर्यंत,काही खास गोष्टी.

हिंदुस्तानात कोणत्या प्रकारचे ड्रोन उडवू शकता?

हिंदुस्तानात पाच प्रकारचे ड्रोन उडविण्याची परवानगी आहे, ते म्हणजे. 1. Nano Drone (250 ग्रॅम पेक्षा कमी वजनाचे), 2. Micro Drone (2 किलो पेक्षा कमी आणि 250 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचे), 3. Small Drone (2 किलो ते 25 किलो मधील), 4. Medium Drone मीडियम ड्रोन (25 किलो ते 150 किलो) आणि 5. Big Drone (150 किलो आणि त्याहून अधिक वजन असलेले).

कोणत्या भागात ड्रोन उडविण्याची परवानगी आहे?

सरकारने ड्रोन्ससाठी “डिजिटल स्काय” नावाची अधिकृत साइट सुरू केली आहे. ज्यावर तुम्हाला एरिओ स्पेस मॅप (क्षेत्र नकाशा) बद्दल माहिती मिळेल. या नकाशावर ड्रोन उडविण्यासाठीचे तीन झोन दिसतील, रेड, येलो, आणि ग्रीन. या मध्ये रेड झोन म्हणजेच नो-फ्लाय झोन, यलो झोन म्हणजेच या भागामध्ये ड्रोन उडविण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. तसेच ग्रीन झोनमध्ये तुम्हाला कोणतीही परवानगी न घेता ड्रोन उडवता येईल. जर तुमच्याकडे नॅनो ड्रोन असेल तर तुम्हाला UIN ची आवश्यकता भासणार नाही, तसेच मायक्रो ड्रोन उडवण्यासाठी तुम्हाला रिमोट पायलट लायसन्सचीही आवश्यकता नाही. पण इतर सर्व श्रेणीतील ड्रोन्ससाठी UIN ची आवश्यकता असेल.

UIN म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे?

UIN म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (Unique Identification Number). हा UIN क्रमांक प्रत्येक मानवरहित विमान प्रणालीसाठी उपलब्ध केला जातो. चार चाकी किंवी दुचाकी वाहनांसारखाच, प्रत्येक ड्रोनला हा विशिष्ट क्रमांक दिलेला असतो. तसेच हा क्रमांक मिळे पर्यंत ड्रोन उडविता येत नाही.

UIN क्रमांकासाठी येणारा खर्च

डिजिटल स्कायच्या अधिकृत पोर्टलवरून तुम्ही सहज ऑनलाइन मान्यतापत्र व प्रमाणपत्र 100 रूपयात मिळवू शकता. डिजिटल स्कायमुळे ही प्रक्रिया सोपी झाली आहे. त्यापूर्वी हे प्रमाणपत्र मिळविणे हे खूप खटापटीचे होते.

ड्रोन पायलट कसे होता येईल?

या प्रमाणपत्रासाठी तुम्हाला डीजीसीएच्या (DGCA) अधिकृत केंद्रात प्रशिक्षण घ्यावे लागेल. त्याचे प्रवेश शुल्क 1000 आहे. तसेच ड्रोन पायलट होण्यासाठी तुमचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे असेल. व शैक्षणिक पात्रता 10 वी पास असायला हवी. यंदाच्या ड्रोन महोत्सवामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 150 प्रशिक्षणार्थींना ड्रोन पायलटचे सर्टिफिकेट देण्यात आले.