कोल्हापुरात अनधिकृत प्रार्थनास्थळांना ठोकले टाळे, पोलीस बंदोबस्तात महापालिकेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर येथील लक्षतीर्थ वसाहत परिसरात असलेल्या अनधिकृत मदरसा आणि प्रार्थनास्थळावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत टाळे ठोकले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

विश्व हिंदू परिषदेकडून महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला लक्षतीर्थ वसाहतीत अनधिकृत प्रार्थनास्थळ आणि मदरसा सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती. या संदर्भात काल (मंगळवारी) महानगरपालिकेत बैठक झाली होती. संबंधित मदरसाचालकांनी मदरसा आणि प्रार्थनास्थळ अनधिकृत असेल तर ते अधिकृत होईपर्यंत बंद ठेवू, अशी भूमिका मांडली होती. आज सकाळी अधिकाऱयांचे पथक पोलीस फौजफाटय़ासह या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता, मदरसा आणि प्रार्थनास्थळ कुलूपबंद असल्याचे दिसून आले. यावेळी महानगरपालिका अधिकाऱयांनीही जागेचा पंचनामा करत अनधिकृत मदरसा व प्रार्थनास्थळ बंद केले.

बेकायदा अतिक्रमण का हटविले नाही; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

n पोलीस फौजफाटा घेऊन अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महानगरपालिका अधिकाऱयांनी हे बेकायदा अतिक्रमण का हटवले नाही, असा जाब विचारत विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱयांनी आक्रमक भूमिका घेतली. यासाठी सायंकाळी महानगरपालिकेत घुसून अधिकाऱयांना धारेवर धरले. त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. येत्या 22 जानेवारीपर्यंत अतिक्रमण न हटवल्यास कायदा हातात घेऊ, असा इशारा हिंदुत्ववादी पदाधिकाऱयांनी दिला.