
जिल्ह्यात आज सलग पाचव्या दिवशीही पावसाची संततधार सुरूच असून, पंचगंगा नदी कोणत्याही क्षणी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील राधानगरीसह इतर धरणातील पाण्याचा विसर्ग तसेच कोल्हापूर, सांगली जिह्यातील महापुरास कारणीभूत असलेल्या कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्गावर प्रशासनाच्या योग्य समन्वय आणि नियंत्रणामुळे तूर्त संभाव्य पूरपरिस्थितीची झळ बसलेली नाही.
आजही पंचगंगेच्या पातळीत सुमारे सव्वा फुटाने वाढ झाली. सायंकाळी सहापर्यंत पंचगंगेची पातळी 37.4 फूट झाली होती. इशारा पातळीपासून अवघ्या एक ते दीड फूट दूर असून, 59 बंधारे पाण्याखाली गेले होते. तर 11 पुलांवर पाणी आले असून, 5 राज्यमार्ग व 13 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 18 रस्ते बंद झाले आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 77.7 मिमी पावसाची नोंद झाली.
धरणक्षेत्रातील पाऊस आणि विसर्गामुळे नद्यांच्या पातळीत अजूनही तासाला इंचाने वाढ होत असून, घटप्रभा, जांबरे आणि कोदे ही मध्यम व लघु धरणे तीन दिवसांपूर्वीच शंभर टक्के भरली आहेत. तर 5.36 टीएमसी क्षमतेचे राधानगरी धरण भरण्यास अजूनही 3 टीएमसी कमी आहे. जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम व लहान धरण प्रकल्पांमध्ये 60 ते 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरण 30 टक्के भरले असतानाच धरणातून अल्प प्रमाणात विसर्ग सुरू ठेवण्यात आला असून, सध्या हा विसर्ग 1400 क्युसेक करण्यात आला आहे. शिवाय पावसाची संततधार पाहता, संभाव्य पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने कर्नाटकाशी योग्य समन्वय ठेवल्याने, महाराष्ट्रातील पंचगंगा व कृष्णा नदीतून जमा होणाऱया पाण्याइतकाच विसर्ग अलमट्टी धरणातून होऊ लागला आहे. सध्या दोन दिवसांपासून अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने, कृष्णा व पंचगंगेच्या वाढत्या पाणीपातळीवर पाटबंधारे खात्याला यश आले आहे.
जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावती, कासारी, कडवी, वेदगंगा, वारणा, घटप्रभा, दुधगंगा, कुंभी, तुळशी, ताम्रपर्णी, धामणी, हिरण्यकेशी या नदीवरील एकूण 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
गगनबावडा येथे 77.7 मिमी पाऊस
– जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 77.7 मिमी पावसाची नोंद झाली. हातकणंगले 14.6, शिरोळ 8.8, पन्हाळा 43.4, शाहूवाडी 48.4, राधानगरी 51.2, करवीर 30.2, कागल 26.3, गडहिंग्लज 18.9, भुदरगड 38.3, आजरा 38 मि.मी. आणि चंदगड तालुक्यात 72.7 असा एकूण 35.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
विशाळगडावरील दगडी बुरुज कोसळला
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती ताराराणी यांनी स्वराज्याची राजधानी स्थापन केलेल्या ऐतिहासिक विशाळगडावरील एक दगडी बुरुज ढासळल्याची घटना आज समोर आली आहे. गडावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्यावर हा बुरुज ढासळल्याने जिना वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने गडावर ये-जा सुरू असल्याचे शाहूवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.


























































