कोल्हापूर जिल्हय़ात निर्बंध शिथिल होणार नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हा जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. अजूनही संख्या नियंत्रणात नसल्याने शासनाने ठरवून दिलेले निर्बंध अजिबात शिथिल केले जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्या लाटेत सर्व घटकांनी सहकार्य केले, तसेच यापुढेही करावे, अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही ते म्हणाले.

राज्यात इतर जिल्ह्यांत कोरोनाची दुसरी लाट कमी होत आहे. मात्र, कोल्हापुरात वाढती रुग्ण आणि मृत्यूसंख्या नियंत्रणात येत नसल्याने जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे आज जिल्हा दौऱयावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱयांकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यात अतिशय उत्तम काम झाले होते. त्यामुळे कोरोना आटोक्यात आला. मात्र, यावेळी तशी परिस्थिती नाही. जिल्ह्यासाठी आणखी औषधे, कोरोना प्रतिबंधक लस, निधी यांसह आवश्यक कामाचा आढावा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱयांकडून घेतला आहे. यापुढे गृहविलगीकरणाऐवजी जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात येणार आहे. शिक्षण, सहकार, साखर कारखाने, दूधसंस्थांनी प्राणवायू प्रकल्पासह कोविड सेंटरसाठी आणखी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

रुग्णालये, कोविड सेंटर आदीना फायर, ऑक्सिजन, इलेक्ट्रिकल ऑडिट करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीपीआरच्या फायर ऑडिटची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे. संभाव्य तिसऱया लाटेचा धोका लक्षात घेऊन कोरोना चाचण्यांची संख्या दीड ते दुप्पट करावी. लहान मुलांसाठी टास्क फोर्स सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात इतर जिल्ह्यांत कोरोनाचे प्रमाण अधिक असताना, कोल्हापुरात मात्र हे प्रमाण कमी होते. आता उलट चित्र असल्याने येथे निर्बंध अजिबात शिथिल केले जाणार नाहीत. उलट कोणी नियम पाळत नसेल तर ते अधिक कडक केले जातील. कोल्हापूरने लवकरात या संकटातून बाहेर पडावे, यासाठी थोडे आणखी कडक निर्बंध सोसावे लागणार आहेत. आम्ही येथे निर्बंध लादण्यासाठी आलेलो नाही. सकाळी अनेकांना मास्कविना पाहिले. स्वतःचे आरोग्य धोक्यात घालणाऱयांमुळे निष्पापांनाही याचा फटका बसत असल्याचे निदर्शनास आणून देत जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यास सांगितल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

लसीकरण करण्यात आलेल्या भागात पॉझिटिव्ह रेट कमी दिसून येत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह प्रमाण जास्त असलेल्या भागात प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. सध्या शहर भागात दिव्यांगांना लसीकरण करण्यात येत असून, सोमवारपासून तालुका स्तरावरही दिव्यांगांना लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच, सीरम आणि भारत बायोटेकने लसनिर्मिती वाढवली असून, 15 जून अथवा 1 जुलैनंतर लस मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होईल. त्यानंतर लसीकरण केंद्रे वाढविण्यात येतील, असेही अजित पवार म्हणाले.

कंत्राटी सफाई कर्मचाऱयांच्या मानधनाचा मुद्दा अधिवेशनात घेणार

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलै रोजी सुरू होत असून, पुरवणी मागण्यांमध्ये कंत्राटी सफाई कर्मचाऱयांच्या मानधनाचा मुद्दा घेतला जाईल. त्यांचे प्रलंबित वेतन द्यावेच लागणार आहे. त्यासाठी पुरवणी मागणीत ते मंजूर करू, तसेच आशा वर्कर्सप्रश्नीही संबंधितांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू, असेही अजित पवार सांगितले.

चाचण्यांची संख्या वाढवून कोरोना नियंत्रणात आणा – आरोग्यमंत्री

लसीकरणात कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याची बाब चांगली आहे. महाआयुष ऍप, संजीवनी अभियानही जिल्ह्यात चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याचे एकीकडे समाधान आहे. तरीसुद्धा प्रथमदर्शनी जिल्ह्यात चंदगड, गगनबावडा, शिरोळ तालुक्यात कोरोना रुग्णवाढीचा दर अधिक आहे. गडहिंग्लज, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी या तालुक्यांत मृत्यूदर अधिक आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्यूदर कमी होण्यासाठी तपासण्यांवर अधिक भर देऊन बाधित रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून द्यावेत. लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तत्काळ तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. सीपीआर आणि इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे निर्देशही टोपे दिले.

खासगी रुग्णालयांनी अधिकची बिले आकारू नयेत

खासगी रुग्णालयांनी रुग्ण आणि नातेवाइकांना त्रास देणारी अकारण अधिकची बिले आकारू नयेत, या बिलांचे ऑडिट करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दुर्गम भागातील रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. शिवाय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाची आवश्यक रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

…तर कठोर निर्णय घ्यावे लागतील

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडूनच आपल्याला काम करून घ्यायचे असून, त्यांना नाउमेद करून चालणार नाही. म्हणूनच त्यांना येणाऱया अडचणींचाही आढावा घेऊन सुविधा देतो, पण पहिल्या लाटेप्रमाणे आक्रमकपणे काम आताही केले पाहिजे. लोकप्रतिनिधींनीही सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. तरीही फरक पडला नाही, तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला.