कोल्हापूर जिल्हा हादरला, गवत कापण्याच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून; महिन्याभरातील दुसरी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गवत कापण्याच्या वादातून धारदार कोयत्याने तरुणाचा खून केल्याचा आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. किशोर साताप्पा पाटील (वय -30, रा. कुरुकली ता. करवीर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान खून करणारा संशयित किरण हिंदूराव पाटील (वय -28, रा. कुरुकली, ता. करवीर) हा स्वत:हून इस्पुर्ली पोलिस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. गेल्याच महिन्यात उपवडे येथेही गवत कापण्यावरून एका तरुणाचा खुन झाला होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि खून झालेला तरुण दोघेही एकाच गावातील आहेत. कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील कुरुकली, ता. करवीर येथे भोगावती महाविद्यालयाच्या रस्त्यावर हत्ती गवत कापण्यावरुन दोघांत वाद झाला. यावेळी राग अनावर झाल्याने संशयित किरण पाटील याने ऊस कापण्याच्या धारदार कोयत्याने किशोर पाटील याच्यावर सपासप वार केले. मानेवर वर्मी घाव बसल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळचे दृश्य थरकाप उडवणारे होते. हल्ल्यानंतर संशयित किरण पाटील हा स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला. घटनास्थळी करवीर पोलिस ठाण्याचे प्रभारी पो.निरिक्षक संदीप कोळेकर, हवालदार के. डी. माने यांच्यासह दाखल पोलिसांनी पंचनामा केला. तर किशोर पाटील यांचा भाऊ प्रतिराज (वय – 28) याने दिलेल्या तक्रारीवरून, संशयित किरण पाटील याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे