
उजळाईवाडी विमानतळाचे सुरक्षा अधिकारी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे आज वारणा नदी पुलाजवळ घुणकी येथे बेशुद्धावस्थेत मिळून आले. तत्पूर्वी पोलीस अधिकाऱयांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर त्यांनी मेसेज पाठविल्याचे समोर आले असून, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दुपारी तातडीने याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मात्र, पोलीस निरीक्षक काळे यांचा वैद्यकीय अहवाल तसेच जबाबानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
पोलीस निरीक्षक काळे हे यापूर्वी पेठवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची उजळाईवाडी विमानतळाचे सुरक्षा अधिकारी म्हणून तडकाफडकी बदली झाली होती. तपासकामासाठी बाहेर जात असल्याचे सांगून ते रात्री घरातून बाहेर पडले होते. मात्र, जिह्यातील पोलीस अधिकाऱयांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱयांच्या त्रासातून आत्महत्या करीत असल्याचा मेसेज केला आहे.





























































