
गेल्या वर्षीपेक्षा यंदा एक जून ते आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 3 हजार 13 मि.मी. पाऊस झाला. तब्बल 759 मि.मी. पाऊस अधिक झाला. आठवडाभर संततधार पावसाचा जोर पाहाता यंदाही महापुराचा दणका बसणार असे चित्र दिसत होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने कोणत्याहीक्षणी इशारा पातळी गाठण्याची शक्यता असलेल्या पंचगंगेसह जिह्यातील बहुतांश सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत घट झाल्याचे दिसून येत आहे. तूर्त संभाव्य पूरस्थितीचा धोका टळला असला तरी यामागे पाटबंधारे विभागाचा योग्य समन्वयही तितकाच कारणीभूत ठरला आहे.
सन 2005 नंतर 2019 आणि 2021ला आलेल्या महापुराने जिह्याची दैना झाली होती. यावेळी जूनच्या पहिल्या आठवडय़ातच झालेल्या जोरदार वादळी वाऱयाच्या पावसाने जिह्याला पुन्हा सावध केले होते. गेल्या वर्षी जूनच्या पंधरवडय़ातच पंचगंगेसह सर्व नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले होते. यावेळी मात्र जूनमध्ये अपेक्षेपेक्षा सरासरी पाऊस कमी झाला.
राधानगरी धरणाचा पाणीसाठा जेमतेम 30, तर अन्य धरणांचा पाणीसाठा 20 ते 50 टक्के होता. त्यामुळे जिह्यात काही ठिकाणी दुबार पेरणीचे, तर काही ठिकाणी कोरडय़ा दुष्काळाचेही संकट निर्माण झाले होते. पाऊस पडणार की नाही, याची धास्ती निर्माण झाली असतानाच जूनच्या शेवटच्या आठवडय़ात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. गेल्या आठवडाभरात संततधार पावसामुळे जिह्यात पूरस्थितीचे चित्र निर्माण झाले. पंचगंगा नदी 39 फूट या इशारा पातळीपर्यंत कोणत्याहीक्षणी पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती. यापूर्वी महापुराचा अनुभव पाहाता जिल्हा प्रशासनाकडून पूरभागातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पण, गेल्या दोन दिवसांपासून जिह्यात पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घट होऊन नद्यांना आलेला पूर ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. दोन दिवसांत पंचगंगेच्या पातळीत आज दुपारपर्यंत दीड फुटाने घट झाली होती.
गेल्या दोन दिवसांपर्यंत पंचगंगा नदीची पातळी 37.11 फुटांपर्यंत वरखाली होत होती. नदी कोणत्याही क्षणी 39 फुटांची इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, राधानगरी धरण 30 ते 35 टक्के भरलेले असतानाही तसेच पुढे पावसाचा जोर कसा राहील याची धाकधूक असतानाही पाटबंधारे विभागाने या धरणासह अन्य धरणांतून टप्प्याटप्प्याने काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला. आठवडाभरातील संततधार पावसामुळे नद्या- नाल्यांना पूर येऊन पाणीपातळी वाढत असताना नेहमी कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यांस महापुराचा धोका वाढण्यास जबाबदार असलेल्या कर्नाटकातील अलमट्टी धरणातून मोठय़ा प्रमाणात विसर्ग करण्यास येथील पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन ठेवले. नद्यांच्या पाण्याची पातळी स्थिर ठेवण्याचे योग्य नियोजन केले. पाटबंधारेच्या या नियोजनामुळेच गेल्या वर्षीपेक्षा यंदा 758 मि.मी. पाऊस अधिक झाला असतानाही तूर्त संभाव्य पुराचा धोका टळल्याचे दिलासादायक चित्र आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत दीड फुटाची घट होऊन 36.3 फुटांवर आली होती. पावसाचा जोर आजही कमी राहिल्याने रात्री उशिरापर्यंत नद्यांच्या पातळीत आणखी घट होण्याची चिन्हे आहेत.
धरणांतील पाणीसाठा व विसर्ग
जिल्ह्यात 4 मोठे, 12 मध्यम, तर 60 लघु आणि एक उपसा सिंचन योजना असे एकूण 77 धरण प्रकल्प आहेत. घटप्रभा, कोदे, जांबरे हे सुमारे दीड टीएमसी क्षमतेचे धरण प्रकल्प यापूर्वीच शंभर टक्के भरले आहेत. तर राधानगरीसह प्रमुख धरणे सध्या 73 ते 90 टक्के भरली आहेत. गेल्या वर्षी 1 जून ते 18 जुलै या काळात राधानगरी धरणक्षेत्रात 1428 मि.मी., तर यंदा याच कालावधीत 1966 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांतील पाणीसाठा 25 ते 30 टक्के अधिक आहे. अजूनही 46 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यात अवघा 6.4 मि.मी. पाऊस
काल दिवसभरात जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 36.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. हातकणंगले 0.8, शिरोळ 0.4, पन्हाळा 5.8, शाहूवाडी 10.5, राधानगरी 10.6, करवीर 4.8, कागल 2.5, गडहिंग्लज 1.9, भुदरगड 12.6, आजरा 5.6 आणि चंदगड तालुक्यात 10.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.




























































