कोल्हापूर जिल्ह्यात सात ठिकाणी ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प नियोजित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्राणवायूचा तुटवडा नाही. शिवाय सात ठिकाणी जनरेटर प्रकल्प नियोजित करण्यात येत आहेत. ठिकठिकाणाहुन प्राणवायूचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार व निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे यांच्या नियंत्रणाखालील जिल्हा समिती पूर्णवेळ कार्यरत ठेवण्यात आली आहे. तर बेल्लारी येथून प्राणवायूचा पुरवठा सुरळीत मिळण्यासाठी तेथे हेमंत निकम या उपजिल्हाधिकाऱ्यांची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक टँकर सोबत एक स्वतंत्र पोलीस एस्कॉर्ट पुरवण्यात आलेले आहेत.त्यामुळे प्राणवायूची वाहतूक जलद होण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

कोल्हापूर ऑक्सिजनकडून 25 मे.टन, बेल्लारी येथून 12 मे.टन लिक्विड ऑक्सिजन आणि जिल्हयातील इतर प्रमुख रेफिल्रर कडून वायु रूपात तर पुणे येथील आयनॉक्स, तायो निप्पोन या मोठ्या कंपन्यांकडून द्रवरूपात प्राणवायूचा थेट पुरवठा होत आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात प्राणवायूचा तुटवडा नाही. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांना प्राणवायू उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम पूर्ण वेळ कार्यरत आहे.

जिल्ह्यात सात ठिकाणी नव्याने ऑक्सिजन जनरेटर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्यसचिव यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात पुढील काळात प्राणवायू ची कमतरता भासू नये यासाठी,उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज प्रमाणे सात ठिकाणी नव्याने ऑक्सिजन जनरेटर व वायू रुपात प्राणवायू सिलेंडर मध्ये भरण्याचे प्रकल्प पालकमंत्री सतेज पाटील,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या सूचनेनुसार नियोजित असून, त्याबाबत प्रक्रिया सुरु आहे.

त्याशिवाय जिल्ह्यातील कोव्हीड काळजी केंद्र, समर्पित कोविड आरोग्य केंद्र, समर्पित कोविड रुग्णालय आणि अत्यावश्यक प्रसंगी वापरासाठी 10 लिटर क्षमतेचे अतिरिक्त 300 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर खरेदी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.