कोल्हापुरात शिवसेनेचा दणका, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना पुन्हा एकदा कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. जतसह सोलापूरवरही दावा करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून आज शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर केलेल्या दाव्यानंतर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत, आज ऐतिहासिक दसरा चौकातून बोम्मई यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. यावेळी जयंती नाल्याच्या दिशेने जाताना, पोलिसांनी ही तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सांगलीत जोडे मारो आंदोलन

भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून ताबडतोब हटवून त्यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी, या मागणीसह भाजपाचे प्रवक्ते त्रिवेदी आणि कर्नाटकचे बेताल मुख्यमंत्री बोम्मईंचा जोरदार निषेध करत त्यांच्या प्रतिमांना आज सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करीत त्यांच्या प्रतिमेचे दहन करून जोरदार निषेध करण्यात आला.

कर्नाटकच्या बसगाडय़ा रोखल्या

महाराष्ट्रातील एसटी कर्नाटकात बंद करण्यात आल्याचे समजताच शिवसैनिक आक्रमक झाले. येथील मध्यवर्ती बसस्थानकात धाव घेत कर्नाटकच्या बसेस रोखून धरण्यात आल्या. या बसगाडय़ांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून कर्नाटक सरकारला प्रत्युत्तर देण्यात आले. तसेच कर्नाटकच्या बसगाडय़ा महाराष्ट्रात येऊ न देण्याचे आवाहन येथील एसटी प्रशासनाला करण्यात आले.