पाच गडकिल्ल्यांवरील मातीतून साकारली शिवरायांची मूर्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येकजण आपापल्या परीने साजरी करत असतो. कोल्हापुरातील एका कलाशिक्षकाने छत्रपती शिवरायांचे जिवंत स्मारक असलेले गडकिल्ले संवर्धित व्हावेत, या संकल्पनेतून, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पाच गडकिल्ल्यांवरील माती आणि पाणी एकत्र करून साकारलेली शिवरायांची विरासनातील मूर्ती सध्या लक्षवेधी बनली आहे.

सतीश वडणगेकर असे कलाशिक्षकाचे नाव आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य रक्षणासाठी बांधलेल्या राज्यातील अनेक गडकिल्ल्यांपैकी किल्ले रायगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, पन्हाळा आणि भुदरगड या किल्ल्यांवरील माती एकत्रित करून शिवरायांचे शिल्प साकारण्याची कल्पना सतीश वडणगेकर यांना सुचली. यासाठी गेले दोन महिने आपल्या सहकाऱयांसोबत अथक प्रयत्नानंतर त्यांनी साकारलेले हे शिल्प आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी लोकांसाठी खुले केले.

पडझड होणाऱया किल्ल्यांची माती आणि पाणी वाचले पाहिजे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून वडणगेकर यांनी पाच गडकोटांवरील माती एकत्र जमवली. स्वतः शिल्पकला शिक्षक असल्याने आणलेल्या मातीतूनच हे शिल्प साकारण्याचे कसब वडणगेकर यांनी जपले. कोणत्याही अन्य मातीचे मिश्रण न करता गडकिल्ल्यांवरील माती आणि पाण्यातून त्यांनी छत्रपती शिवरायांची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी येथील कुंभार गल्लीत शिवप्रेमी गर्दी करत आहेत.