
क्रेनचा बेल्ट तुटून एक टन काचा अंगावर पडल्याने टेम्पोचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शिरोली एमआयडीसी परिसरात एका काच विक्रीच्या गोडाऊनमध्ये घडली. संदीप सदाशिव खरोसे (वय 33, रा. नृसिंह कॉलनी, फुलेवाडी, रिंगरोड) असे मृताचे नाव आहे.
शिरोली नागाव फाटय़ावर मोमीन यांचे काच विक्रीचे मोठे गोडाऊन आहे. मंगळवारी सकाळी संदीप खरोसे काचा भरण्यासाठी टेम्पो घेऊन या गोडाऊनमध्ये आला होता. काचा टेम्पोत भरताना काचा वाहून नेणाऱया क्रेनचा बेल्ट तुटून बाजूला उभ्या असलेल्या चालक खरोसे यांच्या अंगावर काचा पडल्या. एक टन वजनाच्या काचांखाली चिरडलेल्या खरोसे यांना बाहेर काढण्यासाठी इतर कामगारांनी काचा फोडल्या. जखमी खरोसे यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, खरोसेच्या नातलगांनी मोमीन यांच्या गोडाऊनसह रुग्णालयात धाव घेतली. अपघाताच्या घटनेनंतर मालक व कर्मचारी सीपीआरमधून गेल्याचे समजताच नातलगांनी मृतदेह नेण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर शिरोली पोलिसांनी गोडाऊन मालकाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.


























































