
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची कोलकाता येथील अलिपूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जवळपास चार वर्षांपासून सुरू असलेला न्यायालयीन खटल्यातून मोहम्मद शमीची सुटका झाली आहे. मोहम्मद शमीपासून विभक्त झालेली त्याची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावरिधोत न्यायालयात याचिका दाखल केली होती. घर खर्चासाठी दिलेला 1 लाख रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याचा तिने आरोप केला होता. मात्र, बुधवारी (20 मे 2026) अलिपूर न्यायालयाने मोहम्मद शमीची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे.
मोहम्मद शमी आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ यांच्यामध्ये पोटगीवरून गेले अनेक दिवस वाद सुरू आहे. मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय कुमार मुखर्जी यांनी शमीला त्याची पत्नी आणि मुलीला दरमहा 4 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार 4 लाख रुपयांच्या पोटगीची विभागणी पत्नीला दीड लाख रुपये आणि मुलीला अडीच लाख रुपये अशा प्रकारे निश्चित करण्यात आली होती. मात्र, हसीन जहाँने ही रक्कम वाढवून 10 लाख रुपये प्रतिमहिना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते.

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय कुमार मुखर्जी यांनी आदेशात स्पष्ट केले होते की, खटला पूर्ण होईपर्यंत याचिकाकर्त्यांना आर्थिक स्थिरता मिळण्यासाठी 4 लाख रुपयांची रक्कम योग्य आहे. याशिवाय, मुलीचे शिक्षण आणि इतर महत्त्वाच्या खर्चासाठी शमी स्वतःच्या इच्छेने या रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त आर्थिक मदत करू शकतो, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले होते.























































