चिपळूणमधील महापूरामुळे ठप्प असलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरू

चिपळूणमध्ये आलेल्या महापूरामुळे कोकण रेल्वेची वाहतूक गेल्या दोन दिवसांपासून ठप्प होती. वशिष्टी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने सुरक्षेच्या कारणामुळे कोकण रेल्वेची वाहतूक थांबवण्यात आली होती. पुराचा वेढा कमी होताच पुराचे पाणी ओसरू लागले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा मार्ग सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र मिळताच शनिवारी पहाटे 4.45 वाजल्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान आंबा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. गुरूवारी चिपळूणात महापूर आल्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. शनिवार सकाळपासून कोकण रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग, तसेच दरड कोसळल्याने आंबा घाटही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक सुरूझाल्याने दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या