
लातूरच्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस तिच्या आईला मारहाण करून पळवून नेल्याची घटना लातूर शहरात घडली. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 17 वर्षाची त्यांची मुलगी महाविद्यालयात जात आहे असे म्हणून घरामधून भावाबरोबर वाद करून गेली होती. तिच्या पाठीमागे तिची आई शोधत निघाली तेंव्हा गांधी मार्केटमधील राजीव नगर येथील शुभम भालेराव याच्या अॅटोमध्ये मुलगी बसलेली दिसली. तिला घरी चल असे म्हटले असता शुभम भालेराव यांनी फिर्यादीस चापटाने मारुन शिवीगाळ केली आणि ती तुमच्यासोबत येणार नाही असे म्हणून रिक्षामधून पळवून नेले. घरी जाऊन त्यांनी ही घटना आपल्या पतीला सांगितली. पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन या प्रकरणी शुभम भालेराव याच्याविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.


























































