
81 – महाविकास आघाडी
42 – भाजप, शिंदे गट
24 – तडजोड आणि गट
ग्रामीण अर्थकारण आणि राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱया कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 147 पैकी 81 ठिकाणी निर्विवाद वर्चस्व मिळवत भाजप-मिंधे गटाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करत विजयी घोडदौडीचा गुलाल उधळला. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे, संजय राठोड, तानाजी सावंत आणि भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, विजकुमार गावीत यांचा तर बाजारच उठला. अमरावतीत राणा दाम्पत्य, मोर्शीत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलचा दणदणीत पराभव करत मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघ आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीपाठोपाठ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस महाविकास आघाडीने भाजप-मिंधे गटाला पराभवाची धुळ चारत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना झाला. तर काही ठिकाणी स्वतंत्र पॅनल करून निवडणूका लढविण्यात आल्या. यामध्ये 147 पैकी 81 ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारली. तर महायुतील 42 तर 24 ठिकाणी विविध पक्षांच्या तडजोड करून केलेल्या गटांना यश आले.
परभणीत महाविकास आघाडीचा बोलबाला
परभणी जिल्ह्यात परभणी, गंगाखेड, पूर्णा, सेलू येथे महाविकास आघाडीचाच बोलबाला दिसून आला. शिवसेना खासदार संजय (बंडू) जाधव, शिवसेना आमदार राहुल पाटील, आमदार सुरेश वरपूडकर, जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे परभणीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. जिंतूरला आणि ताडकळस बाजार समितीमध्ये बोर्डीकर यांच्या पॅनलने बाजी मारली.
बीडमध्ये भाजपच्या मुंडे भगीनींना धक्का
बीड जिह्यात प्रीतम मुंडे या भाजपच्या खासदार आहेत. तर पंकजा मुंडे यांचं मोठं वर्चस्व आहे. तरीही महाविकास आघाडीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम मुंडे भगीनींना जोरदार धक्का दिला. अंबाजोगाईत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलला 18 पैकी 15 जागा मिळाल्या आहेत. तर परळी सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या आहेत.
मिंधे गटाच्या आशिष जयस्वालांना धोबीपछाड
नागपूर जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया रामटेक बाजार समितीच्या निवडणुकीत मिंधे गटाचे आमदार आशिष जयस्वाल आणि कॉँग्रेस नेते सुनील केदार यांनी युती करून निवडणूक लढवली. पण सचिन किरपान गटाने 18 पैकी 14 जागा जिंकून जयसवाल-केदार युतीला धोबीपछाड दिला. तिवसा, चांदूर रेल्वे, भातकुली, मोर्शी या बाजार समित्यांमध्येही महाविकास आघाडीला भाजपप्रणीत पॅनलला जोरदार धक्का देत विदर्भात मविआयच्या विजयाचा गुलाल उधळला.
सावंतांना ‘खेकडा’ दाखवला
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मराठवाडय़ात महाविकास आघाडीचाच बोलबाला आहे. परभणी, लातूरमध्ये महाविकास आघाडीने वर्चस्व राखले. धाराशीवमध्ये आठपैकी पाच बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या आहेत. परंडय़ात ‘क्रिएटर’ असलेल्या मंत्री तानाजी सावंतांना मतदारांनी पळताभुई थोडी करत ‘खेकडा’ दाखवला. धाराशीव जिह्यातील आठपैकी कळंब, परंडा, मुरुम तसेच उमरगा आणि वाशी या पाच बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या.
मालेगावात दादा भुसे उताणी
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने पालकमंत्री दादा भुसेंना जोरदार दणका दिला. 18 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय मिळवला. अद्वय हिरे यांनी दादा भुसे यांना अक्षरशः अस्मान दाखवून उताणी पाडले आहे.

























































