बोलीभाषेची समृद्धी – कुडाळी बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्णिका काकडे

कुडाळी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ परिसरात बोलली जाणारी एक प्रमुख बोलीभाषा आहे, ज्याला सामान्यत मालवणी बोली म्हणूनही ओळखले जाते. सिंधुदुर्ग जिल्हा, दक्षिण रत्नागिरी आणि कर्नाटकच्या चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग या भागात ही बोली बोलली जाते. मराठी आणि कोकणी भाषेच्या संवर्गातील अशी ही बोली असून या भाषांच्या प्रभावाखालीच ती तयार झाली आहे.

ग्रीयर्सन यांच्या भाषिक निरीक्षणानुसार या प्रदेशातील जवळजवळ तिसांहून अधिक बोली कोकणी म्हणाव्या लागतील. त्यात मालवणी ही एक वैशिष्टय़पूर्ण बोली आहे. दक्षिण कोकणातील दोडामार्ग सावंतवाडीपासून मालवण, देवगड, फोंडा, वैभववाडी ते राजापूर अशा अरबी समुद्राच्या किनारपट्टीचा प्रदेश आणि गोमंतकाचा सावंतवाडी सीमेलगतचा प्रदेशात ही बोली बोलली जाते.

दैनंदिन जीवनव्यवहाराचे साधन म्हणून या बोलीचा वापर केला जातो. अनुनासिक उच्चार हा या बोलीचा महत्त्वाचा विशेष. त्याचबरोबर हेल काढून बोलण्यात या भाषेचा खरा लहेजा असलेला दिसतो. तसेच अनुनासिक उच्चार हे या भाषेचे खास वैशिष्टय़ आहेत.

अनेक लोककथा, विविध समाजांची लोकगीते आणि लोकनाटय़े मालवणी बोलीत असलेली दिसतात. धाला, मिघा, देसरूढ (अशुभनिवारण विधी) यासारखे लोकविधी या बोलीतील लोकगीतांच्या आधाराने साजरे केले जातात. इथल्या कृषिसंस्कृतीचे दर्शन या बोलीतील अनेक लोकगीतांमधून प्रकट झालेले दिसते. कुडाळी बोलीचे भूसांस्कृतिक वैशिष्टय़ असे की, ही बोली समाजाप्रमाणे आणि जातीसमूहांप्रमाणे विभिन्न रूपांत दैनंदिन जीवनात वापरली जाते.

कोकणातील मुस्लीम समाजात या बोलीचे हिंदीसह एक मिश्ररूप पाहावयास मिळते. मालवणी प्रदेशातून गेलेल्या आणि दीर्घकाळ मुंबईत वास्तव्य करून राहिलेल्या मालवणी माणसांची बोली अशीच मिश्ररूपात ऐकावयास मिळते. मालवणी बोलीत अनेक वैशिष्टय़पूर्ण शब्द आहेत. जसे की, झिल-चेडू (मुलगा-मुलगी), घोव (नवरा), आवाठ (वाडी), सोरगत (लग्नासाठीचे स्थळ), हावको (बागुलबुवा), इरागत (लघवी), वांगड (सोबत), मांगर (शेतघर), कुणगो (शेत) इत्यादी. या बोलीत शब्दांच्या किंवा क्रियापदांच्या शेवटी विशेषत ‘लाव’, ‘लास’, ‘आव’ असे वेगळे कारकवाचक प्रत्यय वापरले जातात. (उदा. जेवलास, चल्लास)