
एकीकडे 17-18 कोटी किमतीच्या खेळाडूंकडून वारंवार निराशा केली जात असताना अवघ्या 20 लाख किंमत लाभलेल्या छोटय़ा पॅकेजच्या खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजीत धमाके करत पैसाच सर्वकाही नसतो, हे फ्रेंचायझींना दाखवून दिले आहे.
म्हणतात की पैसा बोलता है. मोठय़ा किमतीत घेतलेले खेळाडू मोठी कामगिरी करतील अशी सर्वांची अपेक्षा होती, पण यंदाच्या आयपीएलमध्ये मोठा पैसा झाला खोटा, असेच म्हणावे लागेल. पॅमेरून ग्रीन, सॅम करण, बेन स्टोक्ससारख्या विदेशी खेळाडूंना 15 कोटींपेक्षा अधिक रकमेची बोली लावून विकत घेतले गेलेय, पण त्यांच्यावर लावलेला पैसा खोटा झाला आहे. मात्र अवघ्या 20 लाखांत घेतले गेलेले खेळाडू एकामागोमाग धमाके करत आहेत.
स्वस्तातले विदेशीही भारी
एकीकडे आयपीएलमध्ये सर्वात मोठय़ा किमती परदेशी खेळाडूंना लाभल्या आहेत. तरीही काही खेळाडू असे आहेत की ज्यांनी कमी किमतीत थक्क करणारी कामगिरी करत आपला भाव वाढवला आहे. यात डेव्हन कॉन्वे (1 कोटी), रहमानुल्लाह गुरबाझ आणि कायल मायर्स (50 लाख), नूर अहमद (30 लाख), एलिस (75 लाख) यांची नावे घेता येतील. गुजरातसाठी खेळणाऱया नूरने 7 सामन्यांत 11 विकेट घेतले आहेत तर एलिसने तितक्याच सामन्यात 10 विकेट मिळविल्या आहेत. एक कोटीच्या कॉन्वेची कामगिरीही नजर लागण्याजोगी होतेय.
रिंकू ठरला सर्वोत्तम फिनीशर
एका षटकात 29 धावांची गरज असताना सलग पाच षटकार ठोकत नवा इतिहास रचणाऱया रिंकू सिंहने सर्वांचेच लक्ष वेधले. आधी गुजरातच्या तोंडातून विजयाचा घास काढणाऱया रिंकूने काल संदीप शर्माला शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत कोलकात्याला आणखी एक संस्मरणीय विजय मिळवून दिला. रिंकूला कोलकात्याने केवळ 55 लाखांत घेतले होते. त्याचप्रमाणे 50 लाखातला मोहित शर्माही गुजरातला विजय मिळवून देतोय. 60 लाखातला प्रभसिमरन पंजाबसाठी सर्वोत्तम फलंदाजाची भूमिका साकारतोय.
20 लाखांची कमाल
अवघ्या 20 लाखांत चेन्नईने तुषार देशपांडेला संघात घेतले आणि हा अननुभवी खेळाडू पर्पल पॅपच्या शर्यतीत आहे. धोनीने तुषारवर विश्वास टाकत त्याला सर्व सामन्यांत खेळविण्याचे धाडस दाखवलेय. 11 सामन्यांत या मुलाने 19 विकेट टिपलेत आणि तो पर्पल पॅपच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. मथीशा पथिराणानेही आपल्या आगळय़ा गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले असून या श्रीलंकन वेगवान गोलंदाजाने 7 सामन्यांतच 11 विकेट घेत आपली चमक दाखवलीय. कोलकात्याकडून असाच धमाका सुयश शर्मा, पंजाबकडून अथर्व तायडे, मुंबईकडून नेहल वधेरा, गुजरातकडून साई सुदर्शन आणि लखनौकडून आयुष बदोनीने केले आहेत. बदोनी तर लखनौसाठी संकटमोचक ठरतोय. त्याच्या फलंदाजीवर सारेच फिदा झालेत.


























































