मांसाच्या वाढत्या किमतींसाठी महिलांच्या मांड्या जबाबदार, मौलवीच्या विधानाने संतापाचा डोंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मांसाच्या किमतीतील वाढ ही महिलांच्या मांड्यांमुळे होत असल्याचं संतापजनक विधान एका मौलवीने केलं आहे. या विधानामुळे जगभरात संतापाचा डोंब उसळला असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या मौलवीचं नाव सदयबकास डुलोव असं असून मध्य आशियाई देश किर्गिस्तान इथला आहे. रेडियो फ्री यूरोपने दिलेल्या वृत्तानुसार, डुलोव याने एका जाहीर भाषणात महिलांवर हे संतापजनक भाष्य केलं आहे. किर्गिस्तानमध्ये सध्या मांसाच्या किमतीत वाढ झाली आहे. येथे मांस 600 रुपये प्रतिकिलो मिळत आहे. या किमतीत येत्या काळात आणखी वाढणार आहेत, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर राजधानी बिस्केक येथे झालेल्या एका जाहीर सभेत डुलोव याने विधान केलं की, मांसाच्या वाढत्या किमतींसाठी महिलांचे कमी कपडे जबाबदार आहेत. महिलांचं मांस तेव्हा स्वस्त होतं, जेव्हा त्या आपल्या मांड्या दाखवू लागतात. मांसाच्या किमती तेव्हाच वाढतात जेव्हा महिलांच्या मांसाची किंमत घटते, असं विधान डुलोव याने केलं असून त्याच्या विधानाने संताप व्यक्त होत आहे.

डुलोव याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे किर्गिस्तान येथील धार्मिक प्राधिकरणाने डुलोव याने कोणत्याही इस्लामिक कायद्याचं उल्लंघन केलं नसल्याचं म्हटलं आहे.