ग्रँट रोडला पाण्याच्या टाकीत उतरलेल्या कामगाराचा गुदमरून मृत्यू; चौघे जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील नाना चौक येथील ऑगस्ट क्रांती मैदानाजवळच्या पाण्याच्या टाकीत दुरुस्तीसाठी उतरलेल्या एका कामगाराचा गुदमरून मृत्यू तर 4 जण जखमी झाल्याची दुर्घटना शनिवारी रात्री उशिरा घडली आहे. राकेश निगम (45) असे गुदमरून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. इतर जखमींवर नायर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे पाचही कामगार महापालिकेच्या भायखळा येथील पाणी खात्यातील मेंटेनन्स विभागातील आहेत.

मुंबई महापालिकेच्या मेंटेनन्स खात्यातील कामगार नाना चौकातल्या ऑगस्ट क्रांती मैदान येथील पाण्याच्या टाकीला चावी देण्यासाठी गेले होते. ही पाण्याची टाकी जुनी होती. चावी देत असतानाच यातील दोन कामगारांचा तोल जाऊन ते टाकीत पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी अजून दोन कामगार टाकीत उतरले. त्यांना बघण्यासाठी पाचवा कामगार खाली उतरला, पण तोही अडकला. हे पाचही कामगार गुदमरत असल्याचे लक्षात आल्यावर स्थानिकांनी अग्निशमन दलाला मदतीसाठी बोलावले. अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. 12 वाजून 40 मिनिटांनी यातील चार कामगारांना जिवंत बाहेर काढण्यात दलाच्या जवानांना यश आले. मात्र यातील राकेश निगम या कामगाराचा आतमध्येच मृत्यू झाला, तर उमेश पवार, शांताराम भाकटे, सुरेश पवार, बाळासाहेब भावरे या चौघांवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिवसैनिक मदतीला धावले
ही घटना घडताच शिवसैनिक कामगारांच्या मदतीसाठी धावून आले. विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, नगरसेविका अरूंधती दुधवडकर, हेमंत दुधवडकर, शाखाप्रमुख समीर कडलक, राजेश आवळेगावकर, बाळा अहिरेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कामगारांना नायर रूग्णालयात दाखल केले. खासदार अरविंद सावंत यांनी आज सकाळी नायर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्यासोबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित होते. त्यानंतर आमदार मंगलप्रभात लोढा, स्थानिक नगरसेविका मीनल पटेल यांनीही जखमींची विचारपूस केली.