गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध न झाल्यास मंत्रालयात आंदोलन! महिला आंदोलकांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, धुळे

परिस्थिती लक्षात घेऊन योग्य वेळी अक्कलपाडा धरणातील पाणी कालव्यांमध्ये सोडले जाईल. जलसमाधी आंदोलन करू नये असे स्पष्टीकरण प्रशासनाने महिला आंदोलकांना दिले. चर्चेअंती महिलांनी आंदोलन स्थगित केले. परंतु गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध झाले नाही तर धुळे तालुक्यातील महिला मंत्रालयात जाऊन आंदोलन करतील, असा इशारा यावेळी महिलांनी दिला.

पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातील पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यात सोडण्यात यावे. त्यामुळे शेतकऱयांना रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी त्याचा फायदा होईल. परंतु प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अक्कलपाडा धरणातील पाण्याची मागणी फेब्रुवारीपासून होत आहे पण टाळाटाळ केली जात आहे. अक्कलपाडा धरणात सद्यस्थितीत एक हजार दशलक्ष घनफुटांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. उजव्या आणि डाव्या कालव्यात प्रत्येकी पन्नास दशलक्ष घनफूट पाणी सोडावे अशी मागणी घेऊन महिला आंदोलकांनी जलसमाधी आंदोलनास सुरुवात केली. धुळे तालुक्यातील नेर येथे एकवटलेल्या महिला आंदोलक अक्कलपाडा धरणाच्या दिशेने जात असताना पोलीस दलाने त्यांना अडविले. प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत ताब्यात घेऊन चर्चा केली. सध्या निवडणूक आचारसंहिता आहे. त्यामुळे निर्णयास उशीर होऊ शकेल. परंतु वस्तुस्थिती लक्षात घेऊन नक्कीच अक्कलपाडा धरणातील पाणी सोडले जाईल.

प्रशासनाने महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. धरणात थांबलेले पाणी बाष्पीभवन होऊन कमी होणार आहे. त्याऐवजी ते पाणी कालव्यात सोडल्यास शेती उत्पादनात वाढ होईल. महिला-पुरुष शेतमजुरांना रोजगार मिळू शकेल अशी मागणी महिला आंदोलकांमधील शोभा जाधव यांनी केली.