
छोटा राजन टोळीतील गुंड लखनभैया चकमकप्रकरणी गेल्या 10 वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या पोलिसांपैकी एक शिपाई तानाजी देसाई म्हणतात, आम्ही 14 पोलीस अधिकारी व शिपाई आज जन्मठेपेचा कोणताही गुन्हा नसताना शिक्षा भोगत आहोत. एका खतरनाक आरोपीच्या ‘एन्काऊंटर’साठी आम्ही सर्वांनी 140 वर्षे शिक्षा भोगली आहे. मग आता आमचा आणखी किती अंत पाहणार! आम्हाला किती काळ नरकात ठेवणार. त्यापेक्षा आम्हाला आता ‘फाशी’ देऊन आमची सुटका करा, अशी आर्त विनवणी तानाजी देसाई यांनी मुख्यमंत्री, मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
छोटा राजन टोळीतील खतरनाक गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया यास 2006 साली मुंबई पोलिसांनी वर्सोवा येथे चकमकीत ठार मारले; परंतु ही चकमक खोटी ठरवून न्यायालयाने 14 पोलीस अधिकारी व शिपाई यांच्यासह 22 जणांवर कारवाई करण्याचे आदेश विशेष पथकाला दिले. मुंबई क्राइम ब्रँचचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रसन्ना यांनी 22 जणांवर कारवाई केली. त्यातील एक चकमकफेम पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जाधववार यांनी निर्दोष सोडले, तर 21 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा भोगून आज 10 वर्षे लोटली आहेत.
दरम्यान, पोलीस निरीक्षक अरविंद सरवणकर या अधिकाऱयाचे जेलमध्येच निधन झाले, तर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, दिलीप पालांडे, नितीन सरतापे, उपनिरीक्षक गणेश हारपुडे, आनंद पालांडे या अधिकाऱयांसह पोलीस शिपाई तानाजी देसाई, पांडुरंग कोकम, संदीप सरदार या पोलीस शिपायांसह (6 खासगी व्यक्ती) 18 जण ठाणे, पैठण, अमरावती, येरवडा, कोल्हापूर, तळोजा आदी कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. एका खतरनाक गुंडाला चकमकीत ठार मारल्याच्या आरोपावरून या साऱयांनी आतापर्यंत सर्वांनी मिळून 140 वर्षे सजा भोगली आहे.
आम्हाला गुंतवले
येरवडा कारागृहात कैदी असलेले तानाजी देसाई या शिपायाने मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून विनंती केली आहे की, आमचा काही दोष नसताना आम्हाला दोषी ठरविण्यात आले आहे. एका गुंडाला मारायला 22 माणसे कशी काय एकवटतील? कायद्याचा किस काढून आम्हाला गुंतविण्यात आले आहे. तेव्हा आता बस्स झाले. जेलमध्ये नरकयातना भोगण्यापेक्षा आम्हाला एकदाच काय ती फाशी देऊन टाका. आम्ही मोकळे तरी होऊ! गुंड सगळय़ाच गुह्यांतून निर्दोष सुटतात; परंतु पोलिसांना आमची न्यायव्यवस्था सोडत नाही याला काय म्हणावे? असाही सवाल तानाजी देसाई यांनी केला आहे. कुणालाही मारा, परंतु गुंडांना मारू नका असाच संदेश आम्हाला देण्यात आलेल्या शिक्षेवरून दिसत आहे, असेही तानाजी देसाई यांनी नमूद केले आहे.
































































