
राज्यभरात उत्साहात आणि भक्तीभावात गणरायांना निरोप देण्यात आला आहे. मात्र, पुण्यात यंदाही विसर्जन मिरवणुका अजूनही सुरू आहे. तर मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषअय असणाऱ्या लालबागच्या राजाचे विसर्जन अद्याप झालेले नाही. समुद्राला भरती असल्याने मूर्ती तराफ्यात चढवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ओहोटीला सुरुवात झाल्यानंतर राजाचे विसर्जन होण्याची शक्यता आहे.
लालबागचा राजा शनिवारी सकाळी 10 वाजता मंडपातून विसर्जनासाठी निघाला होता. तब्बल 22 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर रविवारी सकाळी आठ वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहचला होता. तोपर्यंत समुद्राला मोठी भरती आली. त्यामुळे मूर्ती स्वयंचलित तराफ्यावर चढत नसल्यामुळे लालबागचा राजाचे विसर्जन रखडले आहे. यापूर्वी लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी वापरण्यात येणारा तराफा वेगळा होता. मात्र, यंदा नव्याने तयार करण्यात आलेल्या तराफ्याचा आकार दुप्पट आहे.
समुद्राला भरती आल्यामुळे हा तराफा हलत आहे. त्यामुळे लालबागचा राजाची मूर्ती हायड्रोलिक्सने वर घेण्यात अडचण येत आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून लालबागचा राजाला तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही त्यात यश आलेले नाही. त्यामुळे गेल्या पाच तासांपासून लालबागचा राजाची मूर्ती समुद्रात आहे. समुद्राला भरती असल्यामुळे लालबागचा राजाचा मूर्तीच्या अर्धा भागापर्यंत पाणी आलेला आहे. कोळी बांधव आणि लालबागचा राजाचे कार्यकर्ते गणपतीला तराफ्यावर चढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ओहोटीला सुरुवात झाल्यानंतर लालाबागच्या राजाचे विसर्जन होण्याची शक्यता आहे.