ललित पाटीलला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यावर कारवाई झालीच पाहिजे, आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात ड्रग्जचे रॅकेट चालवणारे ललित पाटील आणि भूषण पाटील यांना अटक झाली तरी त्यांच्या चौकशीतून ठोस अशी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर त्यांच्या चौकशीनंतर अनेक गौप्यस्पह्ट करू, अशी खुमखुमी माध्यमांसमोर व्यक्त केली होती, मात्र तसे काहीच झाले नाही. या सगळय़ाचा जाब विचारण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे ललित पाटीलच्या वेशात दाखल झाले. धंगेकर यांनी विधान भवन परिसरात ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशा मागणी केली. त्यामुळे आता अधिवेशनातही ललित पाटील प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

माध्यमांसोबत धंगेकर म्हणाले, ललित पाटील या आरोपीने ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्ज रॅकेट चालवले आहे. याबाबत आम्ही कारवाईची मागणी केली आहे. ललित पाटील याला नऊ महिने चांगली सेवा दिली. पोलीस, डॉक्टरांशी संगनमत ठेवून त्याने अवैद्य धंदे सुरू ठेवले. यात त्याने करोडो रुपयांचा व्यवहार केला. संजीव ठाकूर यांना अटक झाल्यानंतर ज्या ज्या मंत्र्यांनी फोन केला त्याचा तपास झाला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली.