CRPFच्या ताफ्यावर हल्ल्याचा मास्टरमाईंड हंजला अदनानची कराचीत हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने जाहीर केलेल्या मोस्ट वाँटेड यादीतील आणखी एका दहशतवाद्याची हत्या करण्यात आली आहे. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अदनान अहमद उर्फ ​​हंजला अदनान याची कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. 2016 साली पंपोरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा हंजला हा मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले होते, तर 22 जवान जखमी झाले होते.

2015 साली जम्मूच्या उधमपूरमध्ये बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचाही हंजला मास्टरमाईंड होता. 2015 सालच्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे 2 जवान शहीद झाले होते तर 13 जवान जखमी झाले. होते. या हल्ल्याचा तपास करणाऱ्या NIA ने 6 ऑगस्ट 2015 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि पुलवामा भागात झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आणि हल्ला घडवून आणण्यात हंजलाचा मोठा हात होता. हंजला नव्याने भरती झालेल्या दहशतवाद्यांची माथी भडकावण्याचे काम करत होता, तो त्यांना प्रशिक्षणही देत होता. हंजला पाकव्याप्त कश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर जाऊन हे प्रशिक्षण देत होता.

हंजलाचा खात्मा झाल्याने लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अदनान अहमद उर्फ ​​हंजला अदनान हा हाफिज सईदच्या मर्जीतील लोकांपैकी एक होता. 3 डिसेंबरला पहाटेअज्ञात हल्लेखोरांनी हंजलाला उडवल्याचे वृत्त आहे. हंजलाला 4 गोळ्या मारण्यात आला. कडेकोट बंदोबस्त असतानाही हंजलाला अज्ञान हल्लेखोरांनी उडवला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदनान अहमद उर्फ हंजला अहमदला त्याच्या घराबाहेर गोळ्या घालण्यात आल्या. हंजलाला पाकिस्तानी लष्कराने गुपचूपपणे कराची येथील रुग्णालयात दाखल केले होते. 5 डिसेंबरला हंजला मरण पावला. हंजलाने अलिकडेच रावळपिंडीतून आपला तळ कराचीला हलवला होता.