मीरेचा स्वर, तुकोबांची आर्त वीणा..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गानसम्राज्ञी  लता मंगेशकर आणि भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संत ज्ञानेश्वरांचे अभंग घरोघरी पोचवले. ओम नमोजी आद्या, असू दे किंवा पसायदान, अवचिता परिमळु किंवा रुणुझुणु रुणुझुणु, रंगा येई ओ किंवा विश्वाचे आर्त असू दे…हा सारा भक्तिमय ठेवाच आहे. लतादीदींच्या स्वरातील ही गीतं ऐकतंच आपल्या दिवसाची सुरुवात होते. दीदींनी या प्रत्येक गीताचे आध्यात्मिक सार उलगडून सांगण्याचा वेगळा  प्रयोगही केला. ‘भावार्थ माऊली’ असे या अल्बमचे नाव आहे. गेल्यावर्षीच या ‘भावार्थ माऊली’ अल्बम रसिकांच्या भेटीला आला.

दीदींच्या गळ्यात संतांचा सूर नांदतो. भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या ‘चाला वाही परदेस’ या ध्वनिफीतीमार्फत मीरेला लता मंगेशकर यांच्या स्वरांचा अलंकार चढवला. म्हारा री गिरीधर गोपाल, केनु संग खेलु होली, म्हाई म्हाने सुपना मे परना रे दीनानाथ, अशी पदे दीदींच्या सूरात ऐकताना मीरेच्या रचनांचा अर्थ उमगतो.

‘अभंग तुक्याचे’ या अल्बमची संकल्पना दीदींचीच.  वृक्षवल्ली आम्हां सोयरे, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ,   असे संत तुकारामांचे अभंग अल्बममध्ये ऐकायला मिळतात.   शिवकल्याण राजा हा तर दीदींचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ऐ मेरे वतन के लोगों

1962 मध्ये चीनविरुद्ध झालेल्या पराभवानंतर संपूर्ण देश निराश झाला. ही निराशा मोडून काढण्यासाठी दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदीप यांनी एक गाणे लिहिले ज्याचे बोल होते ‘ऐ मेरे वतन के लोगों’. गाण्याचे संगीतकार होते  सी. रामचंद्र. आधी आशा भोसले हे गाणं गाणार होत्या. पण काही कारणास्तव आशा यांनी गायला नकार दिला. अशा परिस्थितीत लतादीदींना शेवटच्या क्षणी या गाण्याला आवाज देण्याची संधी देण्यात आली.  लता मंगेशकरांनी   15 ऑगस्टला लाल किल्ल्याकरून पहिल्यांदा हे गाणे गायले, तेव्हा समोर बसलेले बहुतेक लोक रडत होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना अश्रू अनावर झाले.

सेहगल यांच्या भेटीचे स्वप्न अधुरे राहिले

इतरांसाठी आदर्श असणाऱया लतादीदी अभिनेता-गायक कुंदनलाल सेहगल यांना आदर्श मानायच्या. त्या लहानपणापासून त्यांच्या आवाजातली गाणी ऐकत मोठय़ा झाल्या. ज्या दिवशी लता मंगेशकर सेहगल यांना भेटायला जाणार होत्या त्याच्या आदल्या दिवशीच सेहगल यांच्या निधनाची बातमी आली. लतादीदी यांचे सेहगल यांना भेटण्याचे स्कप्न अपूर्णच राहिले.

80 वर्षांपूर्वी रेडिओवर गायले पहिले गाणे

आपल्या कारकिर्दीतील रेडिओवरील पहिले गाणे लतादीदींनी 16 डिसेंबर 1941 साली गायले होते. मी दोन नाटय़गीत गायले होते. जेव्हा माझ्या वडिलांनी रेडिओवरील माझा आवाज ऐकला तेव्हा ते खूप खूश झाले होते. ही आनंदाची बातमी त्यांनी माझ्या आईलादेखील सांगितली होती. आता मला कुठल्याच गोष्टीची चिंता नाही असं म्हणत त्यांनी माझं कौतुक केलं होतं.’ असं ट्विट करत लता मंगेशकर यांनी  रेडिओवर गायलेल्या आपल्या पहिल्या गाण्याची आठवण चाहत्यांना सांगितली होती.

आनंदघन नावाने पाच चित्रपटांना संगीत

गानसरस्वती  लता मंगेशकर गायिका म्हणून सर्वश्रेष्ठ आहेतच, पण त्यांनी संगीतकार म्हणूनही योगदान दिले आहे. ‘आनंदघन’ या नावाने त्यांनी संगीतकार म्हणून छोटासा, पण प्रतिभावान प्रवास केला. त्यांनी पाच सिनेमांना संगीत दिले. संगीतकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट  म्हणजे 1950 मध्ये आलेला दिनकर पाटील यांचा ‘राम राम पाव्हणं’.

प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या मोहित्यांची मंजुळा (1963), मराठा तितुका मेळवावा (1964), साधी माणसं (1965) आणि तांबडी माती (1969) अशा  लागोपाठ चार सिनेमांना त्यांनी संगीत दिले.

सुरुवातीला आनंदघन म्हणजेच लता मंगेशकर हे चित्रपट वर्तुळातील  मोजकी माणसं सोडली, तर कुणाला फारसं माहीत नव्हतं. मोहित्यांची मंजुळा आणि मराठा तितुका मेळवावा या चित्रपटांचे संगीत गाजल्यावर हा आनंदघन नावाचा नवीन संगीतकार कोण याचा शोध सुरू झाला. नंतर साधी माणसं साठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट संगीतकार हा पुरस्कार आनंदघनला जाहीर झाला. हा पुरस्कार घ्यायला दीदी स्टेजवर गेल्या आणि रसिकांना खरा उलगडा झाला.