वृद्ध कलावंतांच्या मदतीसाठी ‘स्वरमाऊली’लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण, नाशिक येथे साकारणार वृद्धाश्रम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या स्वर्गीय आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांचे दीर्घकाळाचे एक स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. लतादीदींच्या इच्छेनुसार नाशिक येथे संगीत क्षेत्रातील गरीब आणि गरजू कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधले जाणार आहे. त्यासाठी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘स्वरमाऊली फाऊंडेशन’ची घोषणा करण्यात आली.

वयोवृद्ध कलावंतासाठी वृद्धाश्रम बांधावे अशी लता मंगेशकर यांची इच्छा होती. नाशिक येथे वृद्धाश्रम बांधले जाणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दीदींनी वृद्धाश्रमाची रचना, त्याची बांधणी यावर चर्चा केली. त्यामुळे दीदींच्या इच्छेनुसार आणि संकल्पनेनुसार ही वास्तू उभारली जाईल, असे संगीतकार मयूरेश पै यांनी सांगितले.

स्वरमाऊली फाऊंडेशनच्या समितीत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, रचना शाह, संगीतकार मयूरेश पै यांचा समावेश आहे. तसेच गायक सोनू निगम, मधुर भांडारकर आदी नामवंत मंडळी सल्लागार समितीत आहेत. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आज स्वरमाऊली फाऊंडेशनला शुभेच्छा दिल्या.

– स्वरमाऊली फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था गरजू कलावंतांसाठी काम करणार आहे. संगीत, रंगभूमी, चित्रपट, परफॉर्मिंग आर्ट आदी क्षेत्रांतील कलावंतांना मदतीचा हात देणार आहे. कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधण्याबरोबरच उतारवयात हलाखीत जीवन जगणाऱया आणि कुटुंबाकडून दुर्लक्षित झालेल्या वयोवृद्ध कलावंतांना फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे.