
औसा (जिल्हा लातूर) येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी छेडण्यात आलेल्या उपोषणाला समर्थन दर्शविण्यासाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तहसिल कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. पण पोलिसांनी त्याच्या हातातून रॉकेलच्या बाटल्या खेचून घेतल्या.
लातूरमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी, पिकविम्याचा शंभर टक्के परतावा द्यावा, ठिबक व तुषार सिंचनासाठी 100 टक्के अनुदान जाहीर करावे, टंचाईग्रस्त गावात पाण्याचा पुरवठा व जनावरांना चाऱ्याची सोय करावी, आदी मागण्यांसाठी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवकर्ण वाघ, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदिप ताडगे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय जऱ्हाड, राधाकिसन शिंदे, राम सिरसाट आदींसह 25 कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

































































