
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वडवळ नागनाथ शाखेतील व्यवस्थापक व इतर कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे खातेदारांना, शेतकऱ्यांना तासनतास तळपत्या उन्हात थांबावे लागत आहे. दिवसेंदिवस उन्हाचे तापमान वाढत असताना चक्क बँकेचे दार बंद करून एका खिडकीतून बँकेचे व्यवहार सुरू असल्याने वयोवृद्ध शेतकऱ्यांना तासनतास तळपत्या उन्हात बॅकेबाहेरच थांबावे लागत आहे. यामुळे खातेदारातुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत समजली जाते. शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार हे जिल्हा बॅकेतच असुनही शेतकऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याने खातेदारातुन नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या वडवळ नागनाथ येथे शेतकऱ्यांचा पिक विमा आला आहे. या विम्याचे वाटप सुरू असल्याने शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याचे कारण सांगून व्यापारी, बचत खातेदार यांनाही बँकेच्या बाहेरच तासनतास उन्हातच उभे केले जात आहे.
दरम्यान, दुपारी बारा च्या सुमारास कॅश संपल्याचे सांगून कॅश आणण्यासाठी कर्मचारी गेले आहेत असे सांगितले जाते. तसेच मार्च एन्ड असल्याने पीक विम्याची, खात्यावरील पूर्ण रक्कम देण्यासही टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याकडे लातूर जिल्हा बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी लक्ष देऊन मनमानी कारभार तत्काळ थांबवावा व बंद असलेले बँकेचे दार उघडे ठेवावे. पीक विमा रकमेच्या वाटपासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, गरज पडल्यास पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी सर्वसामान्य खातेदारातून केली जात आहे.






























































