
लातूर जिल्ह्यात घोड्यांमध्ये ग्लँडर्स या अत्यंत संसर्गजन्य आणि माणसांमध्येही पसरणाऱ्या झूनॉटिक (मानवी संक्रमक) रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. आज दुपारी 1 वाजता तातडीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस पशुसंवर्धन, आरोग्य, पोलीस, महानगरपालिका विभागांचे अधिकारी तसेच लातूर जिल्ह्यातील घोडामालक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यात एक घोडा ग्लँडर्स पॉझिटिव्ह आढळला असून चार घोडे संशयित म्हणून ओळखले गेले आहेत. ग्लँडर्स आणि फारसी कायदा 1899, राष्ट्रीय अश्व कृती योजना 2019 आणि प्राण्यांतील संसर्गजन्य व संक्रमक रोग अधिनियम 2009 यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी लातूर यांनी आदेश निर्गमित करून बाधित घोड्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने दयामरण देण्यात आले.
डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त लातूर यांनी या बैठकीत सादरीकरणाद्वारे ग्लँडर्स या रोगाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पाच किलोमीटर परिसरातील सर्व घोड्यांचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळा व हरियाणामधील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र, हिसार येथे तपासणीसाठी पाठवले जात आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी स्पष्टपणे सांगितले की,ग्लँडर्स हा “सूचना देणे बंधनकारक ” व माणसांमध्ये पसरणारा आजार आहे. त्यामुळे पशुसंवर्धन, आरोग्य, पोलीस आणि महानगरपालिका विभागांनी योग्य ती दक्षता घ्यावी. पोलीस प्रशासनाने घोड्यांची वाहतूक थांबवण्यासाठी उपाय करावेत.
घोड्यांमध्ये नाकातून पू येणे, फोड, ताप, अशक्तपणा अशी लक्षणे दिसल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी त्वरित संपर्क साधावा. घोड्यांचे निवासस्थानी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची काळजी घ्यावी . कोणतीही लक्षणे दिसल्यास पशुसंवर्धन विभागाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.