
खून प्रकरणात साक्ष बदलण्यासाठी पोलिसांच्या समोरच साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उदगीर येथे घडली. या प्रकरणी चार जणांविरुध्द उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुस्ताक शफि मुजेवार यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, मागील वर्षी मिर्झा फजल बेग याचा असद खुर्शीद शेख, अल्ताफ खुर्शीद शेख, सद्दाम खुर्शीद शेख, इमान खुर्शीद शेख, आक्रम खुर्शीद शेख यांनी तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केला होता. या खून प्रकरणात फिर्यादी मुस्ताक शफि मुजेवार हा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. फिर्यादी हा पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेला असताना तिथे उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनमधून त्याच्या नावाने आवाज देण्यात आला. त्यामुळे तो तिथे गेला असता व्हॅनमध्ये असद खुर्शीद शेख, अल्ताफ खुर्शीद शेख, सद्दाम खुर्शीद शेख, आक्रम खुर्शीद शेख हे होते. त्यावेळी पोलीस व्हॅनच्या मागील दाराजवळ दोन पोलीस कर्मचारी उभे होते त्याचप्रमाणे समोरही दोन पोलीस कर्मचारी उपस्थित होते. खून प्रकरणात कोर्टात तू काहीच पाहिलेले नाही, अशी साक्ष दे अन्यथा तुलाही मिर्झा फजल शेख प्रमाणेच जीवे मारू, अशी धमकी दिली. उदगीर शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी चारजणांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.




























































