निलंगा तालुक्यातील सोनखेडमध्ये वानराचा धुमाकुळाने 50 लोक जखमी, वन विभागाचा पकडण्याचा प्रयत्नही फसला

निलंगा तालुक्यातील सोनखेड येथे मागील तीन दिवसांपासून एका वानराने धुमाकूळ घातला आहे. त्या वानराने गावात धुमाकूळ घालत आतापर्यंत या वानराने 50 ते 60 महिला व पुरुष व वयोवृद्ध लोकांना जखमी केले असून, यातील दोघेजण गंभीर आहेत.

गावात या वानराने धुमाकूळ घातल्यामुळे लोकांनी हाकलुन देण्याचे प्रयत्न केले पण माजल्यामुळे लोकांच्या अंगावर झडप घालत जखमी करत होता त्यामुळे लोकांनी शेवटी दोन दिवसानंतर वानराला पकडण्यासाठी वन विभागाला कळविल्यानुसार विभागाचे 50 हून अधिक कर्मचारी गावात दाखल झाले असून, त्यांनी गावाला घेराव घातला पण तो वानर अखेर पळुन जाण्यात यशस्वी झाला.

दोन दिवसापूर्वी सुरुवातीला एक-दोघांना चावा घेतल्याने ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले. मात्र, कालपासून हा वानर माणूस दिसताच त्याच्यावर हल्ला करून जखमी करत होता. या वानराच्या हल्ल्यात आतापर्यंत 50 ते 60 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वानराच्या हल्ल्यात एक पुरुष व महिला गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामपंचायत व वन विभागाने गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना वन विभागाने दिलेल्या आहेत. गावातील सर्व व्यवहार ठप्प असून, भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, निलंगा तहसीलदारांना गावातील लोकांनी कळविले असल्याचे सरपंच नागनाथ स्वामी यांनी सांगितले.

वन विभागाकडून जाळे टाकून पकडण्याचा प्रयत्नही फसला…

सोनखेड येथे वानराला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने वन अधिकारी संतोष बन, देवणी विभागाचे वन अधिकारी नामदेव डिगोळे, डी. डी. मंगरुटे, एस. वाय. बडगणे, पारसेवाड आदींचे पथक गावात गस्त घालत असून, वानराच्या मार्गावर जाळे टाकण्यात आले आहे. मात्र, शुक्रवारी दुपारपर्यंत वानर वन विभागाच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पुन्हा पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.