
संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करुनही डीपी नादुरुस्त असल्याने संतप्त शेतकऱ्याने न्याय न मिळाल्यास 10 डिसेंबर रोजी डीपीवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. ही घटना औसा तालुक्यातील नांदुर्गा येथील आहे.
नांदुर्गा येथील शेतकरी नेताजी बाबुराव पाटवदकर यांची नांदुर्गा शिवारात एकूण सात एकर जमीन आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून सतत होणारी नापिकी त्यातच याहीवर्षी पाऊस असताना सुद्धा गोगलगाय प्रादुर्भावामुळे हाती आलेले सोयाबीन पीकही गेले. परंतु, शेतात मुबलक पाणीसाठा असल्याने काहीतरी करता येईल या आशेने पाटवदकर यांनी घरातील सोन्याची दागिने गहाण ठेवून शेतातील वीज बिल भरणा केला व उरलेल्या रकमेतून खत बी-बियाणे आणून पेरणी केली. परंतु, पेरणी केल्यानंतर म्हणजे मागील 15 दिवसापासून वीजपुरवठा करणारी डीपी ही नादुरुस्त असल्याकारणाने दुबार पेरणी केलेले पीक पाणी नसल्याने सुकून जात आहे.
या डीपीमध्ये 100 केव्ही च्या एका डीपीवर किमान 12 शेतकरी कनेक्शन घेऊ शकतात. परंतु, या डीपीवर तब्बल 27 कनेक्शन जोडलेले आहेत. यामध्ये 14 शेतकर्यांचे कनेक्शन हे अवैध्य असून अतिरिक्त कनेक्शन जोडले असल्यामुळे सतत डीपी जळत आहे. संबंधित विभागाला वारंवार कल्पना देऊनही त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळत नाही. याबाबत योग्य न्याय नाही मिळाल्यास पाटवदकर यांनी 10 डिसेंबर रोजी डीपीवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत निवेदन महावितरण कार्यालय किल्लारी, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी दिले आहे.

























































